Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने 11 जण दगावले; मुख्यमंत्र्यांसह, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडून रुग्णांची विचारपूस
Maharashtra Bhushan Award Ceremony : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला आणि त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला. 19 जणांवर अद्यापही उपचार सुरु असून आठ जणांना उपचारांनंतर सोडून देण्यात आलं.
Maharashtra Bhushan Award Ceremony : नवी मुंबईतील खारघर (Kharghar) इथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या अनेकांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास जाणवू लागला आणि त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला. 19 जणांवर अद्यापही उपचार सुरु असून आठ जणांना उपचारांनंतर सोडून देण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) रात्री आठ वाजता आजारी श्री सदस्यांना भेटण्यासाठी कामोठेतील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) पोहोचले. यावेळी उपाचप घेत असलेल्या रुग्णांची संवाद साधला, त्यांची विचारपूस केली. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली. याशिवाय एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. तसंच रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारही रुग्णांच्या भेटीला
मुख्यमंत्र्यांनंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह अरविंद सावंत आणि विनायक राऊत हे देखील एमजीएम रुग्णालयात पोहोचले. इथे त्यांनी आजारी असलेल्यांची विचारपूस केली.
मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची भरपाई
दरम्यान या कार्यक्रमाद मृत पावलेल्या श्री सदस्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली तसंच आजारी असलेल्यांचा उपचारांचा खर्च राज्य सरकार करणार असंही जाहीर केलं.
कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास, अकरा जणांचा मृत्यू
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. परंतु या कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला.
कार्यक्रमादरम्यान जवळपास सव्वाशेच्या आसपास लोकांनी डिहायड्रेशनची तक्रार केली. त्यांना तातडीने घटनास्थळी असलेल्या 30 मेडिकल बूथमध्ये नेण्यात आले. 13 रुग्णांना विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मैदान खचाखच भरले होते. श्री सदस्य (धर्माधिकारी यांची संस्था) यांच्या अनुयायांना कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. त्यामुळे ते भर उन्हात कार्यक्रम पाहत होते. त्यांना शेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली नव्हती. शिवाय या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच लोकांची ये-जा सुरु झाली होती आणि सकाळी 11.30 वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम एक वाजेपर्यंत चालला. यातील अनेक जण शनिवारीच आले होते.
मृतांची नावे
1. तुळशीराम भाऊ वागडे, (वय 58 वर्षे, रा. जांभूळ विहीर ता जव्हार)
2. जयश्री जगन्नाथ पाटील, (वय 54 वर्षे, रा वारळ पो मोदडी ता म्हसळा)
3. महेश नारायण गायकर, (वय 42 वर्षे, रा. मेदडू ता म्हसळा)
4. मंजुषा कृष्णा भोगडे, (रा. भुलेश्वर मुंबई, मूळगाव श्रीवर्धन)
5. भीमा कृष्णा साळवे, (वय 58 वर्षे, रा. कळवा ठाणे)
6. सविता संजय पवार, वय 42 वर्षे, रा. मंगळवेढा सोलापूर)
7. स्वप्नील सदाशिव किणी, (वय 32 वर्षे, रा. विरार)
8. पुष्पां मदन गायकर (वय 63 वर्षे, रा. कळवा ठाणे)
9. वंदना जगन्नाथ पाटील (वय 62 वर्षे, रा. माडप ता खालापूर)
10. कलावती सिद्धराम वायचल (रा. सोलापूर)
11 महिलेची ओळख पटवणं अद्याप बाकी