हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, हेल्मेटसक्तीसाठी नाशिक पोलिसांना अनोखा उपक्रम
नाशकात काही आरोग्याची समस्या किंवा इतर काही विशेष कारणास्तव हेल्मेट घातले नसेल तर वाहनचालकाचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे वाहतूक शाखेकडून पाठवला जाणार आहे.
नाशिक : नाशिक शहरात तुम्हाला जर तुमच्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकायचे असेल तर तुमच्या डोक्यात हेल्मेट असणं आता गरजेचं असणार आहे. हेल्मेटचा वापर करा असे वारंवार आवाहन करून देखील अनेक वाहनचालक हेल्मेट घालत नसल्याने अखेर पोलिसांना हे पाऊल उचलावे लागले आहे. पोलिस आयुक्त दिपक पांडेय यांच्या आदेशानूसार 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नाशिक शहरात 2017 ते जून 2021 या साडेचार वर्षांच्या काळात 782 अपघातांमध्ये 467 दुचाकीस्वार हे मयत झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात 394 दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले नव्हते, हेल्मेट घातले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. हिच आकडेवारी विचारात घेता शहरात हेल्मेटसक्ती केली जात असल्याचं वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौघुले यांनी स्पष्ट केलंय. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल पंपचालकांच्या बैठका घेऊन 'हेल्मेट असेल तरच दुचाकीचालकांना पेट्रोल द्या' असे आदेश त्यांना देण्यात आल्याचही चौघुले यांनी म्हटलंय.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पेट्रोल पंपचालकांना पोलिसांकडून एक नियमावली आखून देण्यात आली आहे. त्यानुसार हेल्मेट असेल तरच पेट्रोल मिळेल असे फलक प्रत्येक पेट्रोल पंपावर लावावेत. पेट्रोल पंपावर उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच 45 दिवस त्यामध्ये रेकॉर्डिंगची क्षमता असावी, हेल्मेट घातले नसेल तर त्याचे कारण आणि संबंधित वाहनचालकाची माहिती एका फॉर्मवर लिहावी आणि ते फॉर्म दररोज वाहतूक विभागाच्या कार्यालयात जमा करावेत, या आणि इतर बाबींचा त्यात उल्लेख आहे.
काही आरोग्याची समस्या किंवा इतर काही विशेष कारणास्तव हेल्मेट घातले नसेल तर वाहनचालकाचा वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव RTO कडे वाहतूक शाखेकडून पाठवला जाणार आहे. त्यामुळे हेल्मेट न घालणं वाहनचालकांना चांगलंच महागात पडणार आहे.
नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता ही सक्ती केली जात असल्याचं पोलिसांकडून जरी सांगण्यात आलं असलं तरी मात्र या उपक्रमामुळे पेट्रोलपंपावर वाहनचालक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा अध्यादेश जारी करताच पेट्रोल पंप डीलर असोसिएशनकडून नाराजी व्यक्त केली जात होती. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांची देखील त्यांनी भेट घेत यावर तोडगा काढण्याची विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रत्येक पंपावर पोलिस बंदोबस्त देखील दिला जाणार असल्याचं आश्वासन पोलिसांकडून पेट्रोल पंप धारकांना देण्यात येताच ही नाराजी दूर झाली आहे.
एकदंरीतच काय तर पोलिस तसेच पेट्रोल डीलर असोसिएशन हेल्मेटसक्ती राबवण्यासाठी आता सज्ज झाले असले तरी मात्र आजपर्यंतच इतिहास बघता ही सक्ती कितपत यशस्वी होते हे पहाणं आता महत्वाचं ठरणार आहे.