Nashik : कांदा खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा, परवाना रद्द करा आणि गाळे ताब्यात घ्या ; जिल्हा निबंधकांचे आदेश
Nashik Onion News : बाजार समिती मालकीच्या बाजार आवारातील तसेच आवाराबाहेरील गाळे, भूखंड ताब्यात घ्या आणि इतर सोईसुविधा बंद करा असे आदेश नाशिक जिल्हा निबंधकांनी दिले आहेत.
नाशिक : जिल्ह्यात कांदा प्रश्न पेटला असून जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून बंदची हाक पुकारण्यात आली आहे. यामुळे बुधवारी दिवसभर कांदा लिलाव ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जे व्यापारी कांदा खरेदी करत नसतील अशा व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करावी, अशा सूचना जिल्हा निबंधकांकडून देण्यात आलेल्या आहेत.
केंद्र सरकारने लागू केलेले निर्यात शुल्क कमी करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने बुधवारपासून बंद पुकारला आहे. बंदमुळे नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांचे कांदा लिलाव बंद आहेत. तत्पूर्वी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशन यांनी आजपासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आवारावरील कांदा लिलावात सहभागी न होण्याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाचा विचार करत पणन मंत्र्यांनी 26 सप्टेंबर रोजी पणन विभागाच्या अधिकाऱ्यासमवेत बैठक आयोजित केली होती. मात्र तत्पूर्वीच आंदोलन सुरू केले आहे, हे आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केलेली होती. मात्र देखील नाशिक जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने आंदोलन सुरू ठेवले.
जिल्हा निबंधक कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या आज सकाळपासून बंद आहेत. व्यापारी वर्गाने पुकारलेल्या बंदच्या संदर्भात नाशिक जिल्हा निबंधक कार्यालयाकडून महत्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार चालू ठेवण्याबाबत पर्यायी व्यवस्था आणि आवश्यक त्या उपाययोजना बाजार समितीने तात्काळ कराव्यात. बाजार समितीचे जे परवानाधारक व्यापारी आणि आडते बाजार आवारावर आलेल्या शेतमालाची खरेदी विक्री करण्यासाठी असमर्थ ठरत आहेत किंवा जाणून बुजून शेतमाल खरेदी विक्रीसाठी विरोध करत आहेत अशा व्यापाऱ्यांचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्याचे अधिकार बाजार समितीस असून बाजार समितीने सदर तरतुदीनुसार तातडीने संबंधीतांचे अनुज्ञप्ती निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई करावी. तसेच जे नविन खरेदीदार बाजार समितीमध्ये शेतमाल खरेदी करण्यास तयार आहेत, अशा खरेदीदारांना परवाना देणेबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच ज्या परवानाधारकांचा परवाना निलंबित किंवा रद्द केला आहे, त्यांच्याकडे बाजार समिती मालकीच्या बाजार आवारातील व आवाराबाहेरील गाळे, भूखंड व इतर सोईसुविधा परवानाधारक व्यापारी, आडते यांना दिलेले असल्यास ते तात्काळ बाजार समितीने ताब्यात घेऊन बंद करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेमकी व्यापारी असोसिएशन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ही बातमी वाचा:
- Onion News : कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, मंत्री अब्दुल सत्तारांचे आदेश