(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News Update : नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात वाडा कोसळला! दोघे जण जखमी
Nashik News Update : नाशिकच्या अशोकस्तंभ परिसरात वाडा कोसळला आहे. या घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत.
Nashik News Update : नाशिक शहरातील वर्दळीचा परिसर म्हणून ओळख असलेल्या अशोक स्तंभ परिसरात वाडा कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. मात्र वाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
नाशिक शहराला वाडा संस्कृती लाभलेली आहे. अशातच शहरातील पंचवटी, मेनरोड परिसरात अनेक पुरातन वाडे पाहायला मिळतात. मात्र, सद्यस्थितीत या वाड्याची अतिशय जीर्ण अवस्था झाली आहे. अनेक वाड्यांना महापालिकेने नोटीस बजावून वाडा खाली करण्याचे आदेशही दिले आहेत. अशातच आज सायंकाळी उशिरा अशोकस्तंभ परिसरात पुरातन वाडा कोसळला. एकीकडे वर्दळीचा परिसर असल्याने त्यातच सायंकाळची वेळ असल्याने नागरिकांची लगबग होती. अशातच वाडा कोसळल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
अशोकस्तंभ जवळील ढोल्या गणपती शेजारी असलेल्या वाड्यातील बेकरीत काल पहाटे चारच्या दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांची कार घुसली होती. त्यामुळे या दुकानाचे आणि वाड्याचे मोठे नुकसान झाले होते. या वाड्याला चांदवडकर वाडा म्हणून देखील ओळखले जात होते. जुना वाडा असल्याने आणि सकाळी झालेल्या अपघातामुळे कमकुवत झाल्याने आज रात्री सव्वा नऊच्या दरम्यान हा वाडा पूर्णपणे कोसळला आहे. हा वाडा पडल्याने दोन दुकानाचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना वाचवण्यात यश आले आहे.
या दुर्घटनेमुळे अशोक स्तंभावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान, पोलिस यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, परिसरातील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाशिकमध्ये वाडा संस्कृती
नाशिक म्हटलं की सरकारवाडा सामोरा येतो. नाशिकचे वाडे या काही केवळ वास्तू नसून इतिहास पुढे घेऊन जाणारी एक अनोखी संस्कृती आहे. येथील वाड्यांचा प्रवास शौर्य, पराक्रम, बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनातील उलाढालीच्या झंझावाताचा एक 'अल्बम'च आहे. आजही पंचवटी, मेनरोड, भद्रकाली, जुनं नाशिक या परिसराचा फेरफटका मारला तरी वाडा संस्कृतीच्या भव्यतेची प्रचीती येते. नाशिकमध्ये वाडा संस्कृतीचं बीजं सातवाहनकाळापासूनच रूजली असणार. कारण, गोवर्धनच्या बाजारपेठेचे युरोपशी व्यापारसंबंध दृढ झाल्याचे पुरावे मिळतात. तेव्हा व्यापारी निवासाबरोबरच संरक्षण, सत्तेची ताकद अन् आर्थिक सुबत्तेच्या जोरावर वाडे उभारत. त्या वाड्यांतून त्यांचा रूबाब, जीवनशैली अन् कार्यपद्धतीही लक्षात यावी इतके बोलके वाडे मराठा कालखंडापर्यंत साकारले गेल्याचे पहायला मिळतात.
महत्वाच्या बातम्या