Nashik Mumbai Highaway : नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे आणि वाहनांचा अतिवेग ठरतोय जीवघेणा, मागील 9 महिन्यात तब्बल 54 लोकांचा मृत्यू
Nashik Mumbai Highaway : नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या सातत्याने वाढत असून वाडिवाऱ्हे ते इगतपुरी दरम्यानचा 35 किलोमीटरचा हा रस्ता प्रचंड धोकादायक झाल्याचं दिसून येतंय.
Nashik Mumbai Highaway Accident : नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा झाला असून मागील 9 महिन्यात तब्बल 54 लोकांनी आपला जीव गमावला असल्याची माहिती समोर आली आहे. या महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील वाडिवाऱ्हे ते इगतपुरी दरम्यानचा 35 किलोमीटरचा हा रस्ता प्रचंड धोकादायक झाला असल्याचं स्पष्ट होतंय. राष्ट्रीय महामार्ग नाशिक विभाग पोलिसांच्या पाहणीत ही बाब समोर आली.
मागील काही दिवसांत महामार्गाच्या वाडिवाऱ्हे ते इगतपुरी या 35 किमीच्या दरम्यान आपघातांची (Accident) संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अपघातांच्या मागे वाहनांचा अतिवेग तसेच नादुरुस्त रस्ता हे प्रमुख कारण असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
या महामार्गावरून नेहमी प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या कामकाजाबाबत रोष व्यक्त केला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघात होत असतात. तसेच खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नातही अनेकदा वाहनावरील ताबा सुटण्याचे प्रकार घडतात. यांसह महामार्गावर कुठेही दिशादर्शक फलक आढळून येत नाहीत. त्यामुळेही वाहनचालकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते.
वाडीवाऱ्हे ते इगतपुरी दरम्यानच्या 35 किमीच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे याठिकाणी वाहनांची गती हळू होऊन त्याचा परिणाम जलद वाहतुकीवर होतो. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने घोटी, वाडिवाऱ्हे, पिंपरी फाटा या ठिकाणी सातत्याने ट्राफिक जाम होत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, बेशिस्त वाहनचालक, अतिवेग, अनधिकृत पार्किंग यांच्यावर कारवाई करण्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह देखील रस्त्याच्या डागडुजीबाबत चर्चा करत असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चेंडू ठेकेदाराच्या कोर्टात ढकलण्यात समाधान मानल्याचे दिसून येतंय. याबाबत बोलताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी टोल जमा करणाऱ्या ठेकेदाराला सूचना करण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे.
54 लोकांनी गमावला जीव
या वर्षाच्या 9 महिन्यात या महामार्गाच्या अवघ्या 35 किमीच्या अंतरात तब्बल 54 लोकांनी आपला जीव गमावलाय. मागील 9 महिन्यात याठिकाणी तब्बल 48 भीषण अपघात झालेत. 2022 साली वर्षभरात 42 भीषण अपघात घडले होते आणि त्यामध्ये तब्बल 47 लोकांनी आपला जीव गमावला होता.
ही बातमी वाचा: