MPSC परीक्षा पास होऊनही मेंढ्या राखण्याची वेळ, निकाल लागून दीड वर्षे झाली तरी नियुक्ती नाही
MPSC Student Viral Video : जलसंपदा विभागातील सहाय्यक अभियंत्यांची परीक्षा उत्तीर्ण होऊनही तरूणाला मेंढ्या हाकाव्या लागत आहेत.
![MPSC परीक्षा पास होऊनही मेंढ्या राखण्याची वेळ, निकाल लागून दीड वर्षे झाली तरी नियुक्ती नाही nashik mpsc student shravan ganje viral video malegaon ajang marathi news update MPSC परीक्षा पास होऊनही मेंढ्या राखण्याची वेळ, निकाल लागून दीड वर्षे झाली तरी नियुक्ती नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/596abb7ccf15d67e9531366f0adbd54c169575227992293_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: एमपीएससी परीक्षा (MPSC) उत्तीर्ण होण्यासाठी अनेक तरूण घरदार सोडून वर्षानुवर्षे तयारी करताना आपल्या आजूबाजूला दिसतात. त्या काळात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अक्षरशः जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय. पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही हा संघर्ष संपत नसल्याचं चित्र आहे. एमपीएससीतून जलसंपदा विभागातील सहायक अभियंत्याती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही एका युवकावर मेंढ्या हाकण्याची वेळ आली आहे. श्रावण गांजे असं या तरूणाचं नाव आहे. सोशल मीडियावर त्याला मेंढ्या हाकतानाचा एक व्हिडीओ व्हायरल (MPSC Student Viral Video) झाल्यानंतर हे चित्र समोर आलं.
श्रावण गांजे हा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अजंग या गावचा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत अभियांत्रिकी सेवा 2020 अंतर्गत घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता या पदावर राजपत्रित अधिकारी म्हणून जलसंपदा विभागात त्याची निवड झाली होती. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीन टप्पे पार करत त्याने हे यश मिळवले. या परीक्षेचा अंतिम निकाल 12 ऑगस्ट 2022 रोजी लागला होता. परंतु एक वर्षे उलटूनही अजून त्याला नियुक्ती दिली गेली नाही.
सध्या नोकरी नाही म्हणून हा तरुण आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे वळला असून तो मेंढ्या चारण्याचे काम करतो आहे. त्यासंबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याची पडताळणी करण्यासाठी एबीपी माझा मालेगावातील अजंग या गावी पोहोचला.
कोणतीही स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला तीन महिन्याच्या आता पोस्टिंग देण्यात यावी असा शासनाचा नियम आहे. पण दीड वर्षे झाली तरी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना नियुक्ती दिली जात नाही. या प्रकरणाचा पाठपुरावा मंत्रालयात करण्यात येत असल्याचं श्रावण गांजे याने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
MPSC Student Viral Video : का रखडली नियुक्ती?
या नियुक्त्या का रखडल्या असा प्रश्न विचारल्यानंतर राज्य सरकारकडून एसईबीसी प्रवर्गाचे कारण दिले जात असल्याचं श्रावण गांजे याने सांगितलं. तो म्हणाला की, न्यायालयानेही एसईबीसी आरक्षणासंबधी निकाल देताना सांगितलं होतं की हे 10 टक्के उमेदवार सोडून इतर 90 टक्के उमेदवारांना नियुक्त्या द्या. पण शासन त्याची अंमलबजावणी करत नाही.
या नियुक्त्या लवकर देण्यात याव्यात अशी मागणी करत येत्या 2 ऑक्टोबर पासून सर्व उत्तीर्ण उमेदवार मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं श्रावण गांजे यांने सांगितलं. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असून त्यांना पोटापाण्यासाठी काहीतरी काम करावं लागत असल्याचं श्रावण गांजे यांने सांगितलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)