एक्सप्रेस गाडी थांबवून प्रवाशाला दिली औषधे, रेल्वे प्रशासनाची सतर्कता
प्रवासी आपली महत्वाची औषधे घरी विसरून आल्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांच्या मदतीने छपरा एक्सप्रेस मनमाड येथे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना विसरेली महत्वाची औषधे मिळाली.

नाशिक : जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकावर न थांबणारी छपरा एक्सप्रेस थांबवून मुंबईतून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाला औषधे देण्यात आली. संबंधित प्रवासी आपली महत्वाची औषधे घरी विसरून आल्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांच्या मदतीने छपरा एक्सप्रेस मनमाड येथे थांबवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना विसरेली महत्वाची औषधे मिळाली.
उत्तर प्रदेशमधील महू येथे राहणारे रोषन आरा फारुकी हे कुटंबातील इतर सदस्यांसोबत छपरा एक्सप्रेसमधून मुंबई येथून उत्तर प्रदेशला निघाले होते. परंतु, त्यांच्या गंभीर आजारावरील गोळ्या ते घरीच विसरुन गेले होते. औषधांचा डोस वेळेत घेतला नाही तर तब्बेत बिघडू शकते हे त्यांच्या कुटूंबातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी मनमाड येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी मनमाड मध्ये राहणारे दक्षिण मध्य रेल्वेचे क्षेत्रिय समितीचे सदस्य नितीन पांडे यांना संपर्क साधत या गंभीर घटनेची माहिती दिली.
पांडे यांनी तातडीने भुसावळ मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि मनमाड वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधला. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही क्षणासाठी ही गाडी मनमाड स्थानकावर थांबवण्याचे आदेश पारीत केले. त्यामुळे अवघ्या एका मिनीटासाठी छपरा एक्सप्रेस मनमाड स्थानकावर थांबली. यावेळी रोषन आरा यांचे नातेवाईक रईस फारुकी यांनी औषधे त्यांच्याके सपुर्द केली. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना रेल्वे प्रशासनाला त्यांच्या आजारपणाची माहिती आणि कुठली औषध द्यावी लागतात याचे फोटो सुध्दा द्यावे लागले.
एखाद्या गंभीर रुग्णाला रेल्वे प्रवासा दरम्यान त्रास होत असेल तर प्रशासनाशी संपर्क साधत त्यांना आरोग्य सुविधा पुरविण्यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जनहितार्थ माहिती दिली होती. आज याच गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव फारुकी कुटूंबाला आला.
महत्वाच्या बातम्या
- Election 2022 : तुमच्या मनातून जात कधी जाणार?, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- UP Election: नरेश टिकैत यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही; राकेश टिकैत यांचे स्पष्टीकरण
- 'बापाची चप्पल आली, म्हणजे बापाची अक्कल येत नाही', आनंद परांजपेकडून श्रीकांत शिंदे यांना टोला, महापौर नरेश मस्केंकडूनही प्रत्युत्तर























