Girish Mahajan: सुधाकर बडगुजरांची ठाकरे गटातून हकालपट्टी होताच गिरीश महाजनांचा आणखी एक सूचक संकेत, म्हणाले, 'वैतागलेले पदाधिकारी संपर्कात'
Girish Mahajan: संजय राऊत प्रभारी जिथे होतात तिथली शिवसेनेचे कार्यकर्ते सोडून जातात, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.

नाशिक: नाशिकमध्ये त्यांना उतरती कळा लागली आहे, त्यामुळे संजय राऊत निराश झाले आहेत, त्यामुळे ते अशी वक्तव्ये करत आहेत. नाशिकातील लोकं जातायत त्यामुळे ते निराश झाले आहेत. मी गिरीश महाजन आहे, मी स्वयंसेवक आहे, मी २०-२५ वर्ष सत्तेविरोधात होतो. तेव्हा मला पण आमिषं दाखवली गेली. उद्धव ठाकरेंनी मला सांगावं मी कधी त्यांना निरोप दिला? मी फोन केलेला नाही, ना मदत करा असं बोललो, असं असेल तर त्यांनी सांगावं. सुधाकर बडगुजर यांच्या हकालपट्टीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, त्यांच्या पक्षात कोणी राहणार नाही म्हणून हकालपट्टी करत आहेत. म्हणजे सांगावं आम्ही हकालपट्टी केली. संजय राऊत प्रभारी जिथे होतात तिथली शिवसेनेचे कार्यकर्ते सोडून जातात, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजनांचा आणखी एक सूचक संकेत
त्यांना माहिती आहे, पक्षात कोणी राहणार नाही. त्यामुळेच ते एका-एकाची हकालपट्टी करत आहेत. त्यांना पुढे सांगता आलं पाहिजे आम्ही याला पक्षातून हकललं आहे, पण तिथे राहायला आता कोणीही उत्सुक नाही. संजय राऊत ज्या ठिकाणी जातात तिथे संघटन करायला पण तिथे विघटन होते, नाशिकमध्ये देखील लवकरच आता हेच होणार आहे, असंही पुढे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
नैराश्यातून संजय राऊत हकालपट्टी करत आहेत. बडगुजर त्यांच्या जवळचे होते. त्यांच्यात आपसात वाद आहेत. नगरसेवक, पदाधिकारी जातायत, त्यांना दिसेल आता. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुधाकर बडगुजर भेटलेत. अनेक मोठे पदाधिकारी संपर्कात आहेत, नाराज आहेत वैतागले आहेत, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी
ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची भाषा बदलली होती. मी पक्षात नाराज आहे, असे त्यांनी उघडउघड बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणाच्या रिवाजानुसार सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सुधाकर बडगुजर यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत त्यांना धक्का दिला.
सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी आपण पक्षात नाराज असल्याचे म्हटले होते. त्याच्या आदल्या दिवशीच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. यानंतर बुधवारी सकाळी मातोश्रीवरुन सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा आदेश निघाला. त्यांच्या हकालपट्टीसाठी पक्षविरोधी भूमिका मांडल्याचे कारण देण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी बुधवारी सकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच त्यांना संजय राऊत यांचा फोन आला. संजय राऊतांनी फोनवरुनच उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीचा आदेश दिल्याचे दत्ता गायकवाड यांना सांगितले. त्यानुसार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. आमच्याकडे आदेश चालतो, आम्ही पक्षप्रमुखांना प्रश्न विचारु शकत नाही, असे यावेळी दत्ता गायकवाड यांनी म्हटले.
























