Dhananjay Munde : आधी विपश्यना आता धार्मिक विधी; धनंजय मुंडेंनी माध्यमांशी पुन्हा बोलणं टाळलं, हातानेच मौनव्रत असल्याचं खुणावलं
Dhananjay Munde : काही दिवसांपूर्वी त्यांनी मन:शांतीच्या शोधात नाशिकच्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्र गाठलं. तर आता पुन्हा एकदा ते धार्मिक कार्यक्रमासाठी रामकुंडावर आल्याचे दिसले.

नाशिक: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरण बीडसह राज्यभरात चांगलंच तापलं होतं. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडेंना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याचवेळी करुणा शर्मा यांनी देखील मुंडेंवर अनेक गंभीर आरोप केले. या सर्व घडामोडी घडत असतानाच धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराने ग्रासलं. राजीनामा देताना त्यांनी तब्येतीचं कारण पुढे केलं आणि राजीनामा दिला. त्यानंतर ते राजकारणापासून जरा दूर असल्याचे दिसून आले. देशमुख प्रकरणानंतर त्यांनी चांगलंच मौन बाळगलं. कोणत्याही कार्यक्रमात किंवा राजकीय व्यासपिठावर, नेत्यांच्या दौऱ्यावेळी धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती वारंवार चर्चेचा विषय ठरली. या सर्व घडामोडी आणि राजकीय चढ-उतारानंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे चर्चेत आले आहेत. पण सध्या चर्चा आहे ती मुंडेंच्या शांततेची आणि सुरू असलेल्या अध्यात्माची, काही दिवसांपूर्वी त्यांनी मन:शांतीच्या शोधात नाशिकच्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्र गाठलं. तर आता पुन्हा एकदा ते धार्मिक कार्यक्रमासाठी रामकुंडावर आल्याचे दिसले.
हाताने ओठांवर बोट फिरवून मौन
माजी मंत्री धनंजय मुंडे नाशिकच्या रामकुंडावरती धार्मिक कार्यक्रमासाठी आले. रामकुंडाववरील वस्त्रांतर गृहात धार्मिक विधी पार पडले. या सर्व विधीनंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा माध्यमांनी धनंजय मुंडे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. हाताने ओठांवर बोट फिरवून मौन असल्याचा सूचक संदेश देखील धनंजय मुंडे यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं धनंजय मुंडे यांचं मौन अद्यापही कायम असल्याचं दिसून आलं आहे. मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांनी इगतपुरीत विपश्यनेसाठी आले होते. आज (बुधवारी, ता.4) देखील धनंजय मुंडे धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये दाखल झाले. मात्र, त्यांनी कोणत्याही गोष्टीवरती बोलण्यासाठी नकार दिला आहे. आज संध्याकाळी एका लग्न सोहळ्याला देखील धनंजय मुंडे हजेरी लावणार आहेत.
गोपीनाथगडावरही बोलणं टाळलं?
काल (मंगळवारी) गोपीनाथगडावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथीनिमित्त मुंडेप्रेमींनी मोठी गर्दी केली होती, मुंडेभगिनी आणि धनंजय मुंडे तब्बल अकरा वर्षांनंतर गोपीनाथगडावर एकत्र आले होते. गोपीनाथगडावरती सद्यपरिस्थितीवर काही मार्मिक भाष्यही केलं गेलं. पंकजा मुंडे यांच्या भाषणा इतकीच उत्सुकता धनंजय मुंडेंच्या भाषणाची होती. गेल्या काही महिन्यात राजकीय आणि वैयक्तिक जीवनात प्रचंड चढउतार पाहायला मिळालेले, आजारपणामुळे बोलण्याला मर्यादा आलेले धनंजय मुंडे काय बोलणार हा प्रश्न होता. बऱ्याच दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक कार्यक्रमात दिसले त्यामुळे धनंजय मुंडे उपस्थितांना संबोधित करणार का याची उत्सुकता होती मात्र चेहऱ्याच्या एका आजारामुळे धनंजय मुंडे यांनी भाषण टाळले. ती उणीव पंकजा मुंडे यांनी भरुन काढली.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव आलं आणि धनंजय मुंडे यांच्या अडचणीही वाढल्या. आधी धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही नंतर तर मंत्रीपद सुद्धा गमवावं लागलं. मुंडे कुटुंबियासाठी या सगळ्या अडचणीच्या काळावर पंकजा मुंडेंनी भाष्य केलं, धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराने ग्रासले आणि त्यांच्या बोलण्यावर मर्यादा आल्या. मात्र आपल्या भाषणात शायरीच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देणारे धनंजय मुंडे भाषणापासून दूर राहिले आहेत. संतोष देशमुख प्रकरणापासून सुरू असलेलं त्यांचं मौन आत्ताही कायम असल्याचं दिसून आलं आहे.





















