Nashik : नांदूर मध्यमेशवर पक्षी अभयारण्यातील आग अजूनही धुमसतीच, पक्ष्यांचा अधिवास धोक्यात
नांदूर मध्यमेशवर पक्षी अभयारण्य हे रामसर दर्जा असणारे जागतिक दर्जाचे पक्षी अभयारण्य आहे. परंतु आगीमुळे यामधील पक्ष्यांचा अधिवास तसंच वनस्पती जैवविविधता धोक्यात आली आहे.
नाशिक : जैवविविधतेने संपन्न असलेल्या नाशिकच्या नांदूर मध्यमेशवर पक्षी अभयारण्यात सोमवारी (4 एप्रिल) सायंकाळी भडकलेली आग मध्यरात्रीपर्यंत धुमसत होती. यामुळे हजारों पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. काल पाच साडेपाच वाजता वणवा भडकला, मात्र तो मध्यरात्रीपर्यंत आटोक्यात आलाच नाही. दलदल असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत.
नांदूर मध्यमेशवर पक्षी अभयारण्य हे रामसर दर्जा असणारे महाराष्ट्रचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे जागतिक दर्जाचे पक्षी अभयारण्य आहे. रंगीत करकोचा, स्पून बिल, स्पॉट बिल्डक, राखी बगळा, जांभळा बगळा, जांभळी पाणकोंबडी, यासह विदेशी पक्षात मोडणारे चकरांग, कापशी बदक, थापट्या, गार्गणी, तलवार बदक असे गवळात भागातील, पाणथळ, झाडावरील असे एकूण 40 ते 50 प्रजतीचे हजारो पक्षी सध्या अभयारण्यात वास्तव्यास आहे. आगीमुळे या पक्ष्यांचा अधिवास तसंच वनस्पती जैवविविधता धोक्यात आली आहे.
नांदूरमध्यमेशवर अभयारण्यात वणवा कशामुळे भडकला हे अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र अभयारण्याजवळ असणाऱ्या गळापेरा कोणीतरी पेटवला असावा आणि त्यातून आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. वनविभागाचे अधिकारी पहाटेपर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. परंतु आग पूर्णपणे आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान आहे.
डॉ. सलीम अली यांच्याकडून अभयारण्याचा महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून गौरव
नाशिकच्या निफाड तालुक्यामधील खानगाव थडी इथे गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर 1911 च्या सुमारास दगडी बंधारा बांधण्यात आला. त्यामुळे निर्माण झालेल्या जलाशयाच्या परिसराला 1986 मध्ये अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. 100.12 चौरस किमी क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्याला जगप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून गौरवले आहे. नांदूर मध्यमेश्वरमधील पक्ष्यांच्या अधिवासामुळे तसंच दुर्मिळ पक्ष्यांच्या अस्तित्वामुळे हे क्षेत्र महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्र (IBA) म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
400 हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती प्रजाती
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात विरळ सदाहरित जंगल आणि माळरान परिसर आढळून येतो. 400 हून अधिक विविध प्रकारच्या वनस्पती प्रजाती इथे पाहायला मिळतात. वेगवेगळ्या पाणवनस्पती, आसपासची हिरवीगार शेते, नदी किनाऱ्यावरची वनराई या बाबी देशी-विदेशी पक्ष्यांना आकर्षित करतात.