तिवरे धरण फुटीनंतर नाशिकमधील सर्व धरणांच्या पाहणीसाठी समितीची स्थापना
दरवर्षी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर धरणांची तपासणी केली जाते. मात्र यंदा तिवरे दुर्घटना घडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : तिवरे धरण फुटीनंतर नाशिकमधील प्रशासकीय यंत्रणांना खडबडून जाग आली आहे. नाशिक जिल्हा प्रशासनाने तीन सदस्यीय समिती नेमून जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. पाटबंधारे आणि जिल्हा परिषद अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे.
नाशिमध्ये गंगापूरसह 24 मोठे, मध्यम धरण प्रकल्प आहेत. लघु पाटबंधारे प्रकल्प यांचीही तपासणी केली जाणार आहे. या प्रकल्पांना सध्या काही धोका आहे का? गळती होत आहे का? गळती होत असल्यास त्याची कारणे काय? भविष्यात गळती होण्याची शक्यता आहे का? याची पडताळणी या समितीमार्फत केली जाणार आहे.
दरवर्षी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर धरणांची तपासणी केली जाते. मात्र यंदा तिवरे दुर्घटना घडल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 दिवसाच्या आत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची पाहणी करून त्या संदर्भातला अहवाल शासनाला पाठविणार आहे.
तिवरे धरणफुटीत 20 हून अधिक जणांना मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण 2 जुलै रोजी फुटलं होतं. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जलसंपदा विभागाने सखोल चौकशीसाठी पथक स्थापन केलं आहे.