(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Husain Dalwai in Trimbakeshwar: त्र्यंबकेश्वरमध्ये मोर्चे काढणारे लोकांना काय शिकवतात, याची चौकशी करा; हुसेन दलवाईंची मागणी
Trimbakeshwar: ज्या लोकांनी मोर्चे काढले, अश्लाघ्य भाषा वापरली त्यांच्याविरोधात काही तरी करा. येथील 10 ते 12 संघटना आहेत त्यांची चौकशी करा, ते लोकांना काय शिकवतात, याची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केली.
Husain Dalwai in Trimbakeshwar: नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात उरुसाच्या मिरवणुकीत त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लिम बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर चांगलाच वाद पेटला (Trimbakeshwar Controversy) आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हुसेन दलवाई ज्या उत्तर दरवाजाजवळ मुस्लिम बांधव पोहोचल्याने वाद झाला त्याच ठिकाणी पोहोचून दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी धार्मिक सौहार्द बिघडवणाऱ्यांना चांगलेच फटकारले.
100 वर्षांपासून संदल आणण्याची परंपरा
दर्शन घेतल्यानंतर बोलताना हुसेन दलवाई म्हणाले की, गेल्या 100 वर्षांपासून संदल आणण्याची परंपरा आहे. बाबा शाहजहाँ याचं संदल याठिकाणी येतं. महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ते पुढे म्हणाले की, अश्लाघ्य शब्दांचा वापर केला जात आहे. तुम्ही एसआयटी नेमा, पण देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे की, ज्या लोकांनी मोर्चे काढले, अश्लाघ्य भाषा वापरली त्यांच्याविरोधात काही तरी करा. येथील 10 ते 12 संघटना आहेत त्यांची चौकशी करा, ते लोकांना काय शिकवतात, याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली.
शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेणं आवश्यक
दलवाई पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली देशाची घटना मोडून मनूस्मृती आणायची असेल तर हे देशाच्या विरोधातील आहे. या देशात आता शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेणं आवश्यक आहे. महात्मा गांधी, फुले आंबेडकरांनी जन्म घेणं आवश्यक आहे. सानेगुरुजी यांनी जन्म घेणं आवश्यक आहे, तर धार्मिक सलोखा राहील. तसेच आमच्यासारख्या लोकांनी लोकांना एकत्र आणलं पाहिजे.
जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच त्र्यंबकेश्वर मंदिर वाद निर्माण केल्याचा आव्हाडांचा आरोप
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच त्र्यंबकेश्वर मंदिर वाद निर्माण केल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील अन्य धर्मीय व्यक्तीच्या प्रवेशावरून वातावरण चांगलं तापलेल असताना तेथील काही स्थानिक ग्रामस्थांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. कुठलाही वाद नसताना विनाकारण धर्मीम तेढ निर्माण करून गावातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या सर्वांविरुद्ध कसे लढावे यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ठाण्यात टीप टॉप प्लाझामध्ये पत्रकार परिषद घेत या सर्वांनी आपली भूमिका मांडली. कुठलाही वाद नसताना विनाकारण धर्मीम तेढ निर्माण करून गावातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जेव्हा राज्यकर्ते यांच्याकडे सांगण्यासाठी दुसरं काही नसतं तेव्हा असले जातीय ,धार्मिक वाद उफळले जातात. मी दोन महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आखला जात आहे आणि सध्या बरोबर तेच राज्यात होत आसल्याची घणाघाती टीका आव्हाडांनी केली.
वादाची व्यावसायिक आणि ग्रामस्थांना धग
दुसरीकडे, त्र्यंबकेश्वर नगरीत रोज हजारो भाविक येत असतात, त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते. यावरच गावगाडा सुरु असतो. मात्र एका घटनेने गावाची शांतता तर भंग झालीच आहे रोज एकमेकांच्या सुखदुःखाला उभे राहणारे आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे. याची झळ आता प्रत्येकाच्या खिशाला जाणवू लागली आहे. बाहेरचे लोक येऊन आगीत तेल ओतून जातात मात्र त्याची धग हळूहळू आता त्रंबकेश्वरच्या व्यावसायिकांना आणि ग्रामस्थांना जाणवू लागली आहे. त्यामुळे वातावरण आता लवकरात लवकर निवळावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या