नाशिक मनपाच्या जाहिरातीतील चुकांवर तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण
नाशिक महापालिकेची वर्तमानपत्रातील जाहिरातीतील चूक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मान्य केली.
नाशिक : नाशिक महापालिकेची वर्तमानपत्रातील जाहिरातीतील चूक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मान्य केली आहे. यावेळी अधिकाऱ्यांना हिंदी येत नसेल तर यापुढे ड्राफ्ट बनवण्यासाठी एक्सपर्टची मदत घेणार असल्याचंही मुंढेंनी यावेळी सांगितलं.
कालच 'एबीपी माझा'वर नाशिक महापालिकेच्या जाहिरातीतील हिंदी चुकांची बातमी दाखवली होती. साडेसहा ओळींच्या या हिंदी जाहिरातीत अनेक मराठी शब्द वापरण्यात आले होते. पालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य नियुक्तीसाठी हिंदी भाषेत जाहिरात दिली, मात्र या जाहिरातीतून पालिकेने स्वतःचं हसू करवून घेतलं होतं.
या जाहिरातीत व्याकरणाच्या असंख्य चुका होत्या. हिंदी जाहिरातीत मराठी शब्द टाकून हिंदी भाषेच्या तोडक्या-मोडक्या ज्ञानाचं जाहीर प्रदर्शन करण्यात आलं होतं. हिंदी भाषेत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुदतवाढ, कागदपत्रे, मसुदा यासारखे अनके मराठी शब्द वापरण्यात आले होते.
परिभाषिक शब्द कसे असावेत, याची सूची केंद्र सरकारच्या राजभाषा विभागाच्या माध्यमातून दिलेली असताना महापालिकेने गंभीर चुका केल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात होती.
जाहिरातीतील शब्द - अपेक्षित शब्द
मुदतवाढ - समय सीमा में वृद्धी जादा - ज्यादा कागदपत्रे - प्रलेख, दस्तावेज जाहीर सूचना - सार्वजनिक सूचना मसुदा - मसौंदा ये - यह पे - पर नमूद - उल्लेखित अर्जदार - प्रार्थी, आवेदक