(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा कलेक्शन एजंट अनिल परब, लवकरच अनिल देशमुख शेजारी जातील - किरीट सोमय्या
Kirit Somaiya : परिवहन मंत्री अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे कलेक्शन एजंट आहेत. लवकरच त्यांची रवानगी अनिल देशमुख यांच्याशेजारी होणार आहे, अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.
Kirit Somaiya On CM Uddhav Thackeray and Anil Aarab : परिवहन मंत्री अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे कलेक्शन एजंट आहेत. लवकरच त्यांची रवानगी अनिल देशमुख यांच्याशेजारी होणार आहे, अशी टीका भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ते नाशिकमध्ये कांदा परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
अनिल परब यांनी बेकायदेशीर 25 कोटी रुपयांचा रिसॉर्ट बांधला आहे, त्यातील 15 कोटींचा खर्च अनिल परब यांनी केला नाहीये आणि जर आता हे पैसे सचिन वाझेने दिल्याचे सांगितले तर तेरा क्या होगा कालिया? लवकरच अनिल परब यांना बॅग भरावी लागणार, त्यांना अनिल देशमुख यांच्या शेजारी बसवणार, असा निर्धार सोमय्या यांनी बोलून दाखवला.
मनसुखची हत्या सचिन वाझेने केल्याचे सीबीआयने सांगितले. मग त्याची नियुक्ती करणाऱ्या उद्धव ठाकरेंचे काय होणार ? असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. रश्मी ठाकरे यांनी 19 बंगले अन्वय नाईक यांच्याकडून घेतले. जमीन स्वतःच्या नावावर केली. ग्रामपंचायतीने नावावर घरे पण केली, बँक अकाउंट मधून पैसे भरले. मातोश्रीमध्ये पार्टी पण झाली, असे सोमय्या म्हणाले. या 19 बंगल्याबाबत लवकरच याचिका दाखल करणार असल्याचं सोमय्या यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या बापाची पुण्याई बाजूला ठेवली आहे. भगवी शाल काढून हिरवी घातली आहे. मोदींशी त्यांनी गद्दारी केली. माफिया सरकारचे श्राद्ध लवकरच नाशिकमध्ये घालण्याची ईश्वराने मला शक्ती द्यावी, असे सोमय्या म्हणाले.
नाशिकमध्ये कांदा परिषद -
गेल्या काही महिन्यांपासून कांदा हा शेतकऱ्यांना चांगलाच रडवतोय. रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने तसेच सरकारच्या बदलत्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा हतबल झाला असून अनेक वेळा त्याला रस्त्यावर उतरण्याची देखिल वेळ आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या निफाड तालुक्यातील रुई या गावी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आज कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवला जाणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत हे या परिषदेत उपस्थितआहेत. 1982 साली रुई याच गावी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यानंतर आज पुन्हा 39 वर्षानंतर याच गावी ही परिषद भरविण्यात येते आहे.