Coronavirus Nashik | आर्थिक व्यवहार थांबले, तरी नागरिकांचा जीव वाचेल; नाशिकमध्ये पूर्ण लॉकडाऊन करण्याची महापौरांची मागणी
नागरिकांकडून वारंवार कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं होणारं उल्लंघन पाहता, सरकारनं आता थेट कडक लॉकडाऊनचा इशाराही दिला आहे.
Coronavirus Nashik काही दिवसांपूर्वीच राज्यात संचारबंदीचे नियम लागू झाले. याशिवाय प्रवास आणि दैनंदिन जीवनातील अनेक व्यवहारांवरही निर्बंध आले. कोरोना विषाणूचं संकट आणखी बळावत असल्यामुळं प्रशासनानं हा निर्णय़ घेतला. नागरिकांकडून वारंवार कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं होणारं उल्लंघन पाहता, सरकारनं आता थेट कडक लॉकडाऊनचा इशाराही दिला आहे. किंबहुना नाशिकच्या महापौरांनी यासंदर्भातील मागणी करणारं एक पत्र पालकमंत्री छगन भुजबळ यांना लिहिलं आहे.
नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या पत्रातून नाशिकमधील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं म्हणत या ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ घेतला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, त्या तुलनेत आरोग्य विभागातील कर्मचारी आणि बेडची संख्याही कमी पडू लागली आहे. शिवाय आरोग्य यंत्रणेवर त्यामुळं ताणही येत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत असल्याची वस्तुस्थिती त्यांनी या पत्रातून मांडळी.
नाशिकमध्ये रॅपिड अँटीजन आणि आरटीपीसीआर चाचणीसाठीही नागरिकांच्या रांगा वाढतच चालल्या आहेत. त्यामुळं एकंदर परिस्थिती पाहता त्यांनी लॉकडाऊनची मागणी केली आहे. ल़ॉकडाऊनमुळं आर्थिक व्यवहार थांबतील, पण नाशिककरांचा जीव मात्र वाचेल अशा शब्दांत त्यांनी सक्तीच्या आणि पूर्ण लॉकडाऊनची गरज असल्याची मागणी छगन भुजबळ यांच्याकडे केली.
Kumbh Mela 2021 | पंतप्रधानांच्या विनंतीचा मान राखत कुंभ मेळ्याबाबत मोठा निर्णय
शहरातील स्मशानभूमी अहोरात्र धगधगत असून, रुग्णांच्या नातेवाईकांना अंत्यविधींसाठीही वाट पाहावी लागत आहे, ही मन हेलावणारी वस्तुस्थिती त्यांनी आपल्या पत्रातून मांडली. कुलकर्णी यांनी मांडलेलं हे चित्र पाहता नाशिकमध्ये आता नेमका पूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात छगन भुजबळ काय निर्णय़ घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्यात शनिवारी विक्रमी 67, 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
राज्यात शनिवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागील 24 तासांत तब्बल 67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात 419 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के झाले आहे.