Nashik News: अवकाळीनं होत्याच नव्हतं केलं, आमदार परदेश दौऱ्यावर; ग्रामस्थांकडून नाराजी
Nashik News: अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेठ तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला आहे.
Nashik News: 'लय नुकसान झाली, आधीच औंदा काही पिकला नाही, त्यात रोजगार नाय, अशातच गारपिटीने कहर केला. सगळं घर उजाड झालाय, आमदाराने यायला पाहिजे, फक्त मत मागायला येत्यात, आता आमची एवढी नुकसान कुठं आहेत ते पुढारी,' अशा शब्दांत नुकसानग्रस्त भागातील गावकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारला.
एकीकडे नाशिक जिल्ह्यातील (Nashik) अनेक भागांत अवकाळी पावसाने कहर केला असून पेठ तालुक्यात (Peth Taluka) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पेठ तालुक्यातील आमलोण, अभेटी, खर्डापाडा, शेवखंडी, अभेटी, घनशेत, कुळवंडी आदी परिसराला अक्षरशः गारांच्या पावसानं झोडपून काढल आहे. साधारण 70 ते 80 हून अधिक घरांची पडझड झाली असून अशातच पंचनामे झाले असले तरी अद्याप पेठ तालुक्याचे आमदार नरहरी झिरवाळ मात्र अद्याप नुकसानग्रस्त भागांत आली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसतो आहे. दुसरीकडे पेठ तालुक्यातील या भागात कधी नव्हे ते इतका पाऊस बरसला आहे. अशात अनेक घरांचे, कुणाच्या पडवीचे, शाळेचे नुकसान झाले आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करणे गरजेचे असताना आमदार नरहरी झिरवाळ जपानच्या दौऱ्यावर आहेत.
झिरवाळ हे आपल्या साधी राहणीमान, कोणत्याही प्रश्नाला सडेतोड उत्तरे देणारे म्हणून ओळखले जातात. मात्र अशातच ज्या पेठ तालुक्यातील आमदार म्हणून ओळखले जातात, त्या पेठ तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सर्वत्र घरांची दुर्दशा झाली, पत्रे उडाल्याने शाळा मंदिरात भरवली जात आहे, अनेकांचे संसार उघडयावर आले आहेत, आंब्याच्या बागांचे लाखांची नुकसान झाले आहे. अशात नागरिकांना स्थानिक आमदारा चा आधार मिळणे आवश्यक असताना, नुकसान झालेल्या लोकांना मदत मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका मांडणार प्रतिनिधी हवा असताना आमदार झिरवाळ मतदारसंघात उपस्थित नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
बर्डापाडा येथील महिला म्हणाल्या की, आज एवढी नुकसान झालंय की एवढ्यात भरून निघणार नाही, मात्र तीन दिवस झालेत, आमदार अजून आले नाहीत, शासन पंचनामे करतंय पण सरसकट नाहीतर काहीच कुटुंबाचे करत आहेत, असा आरोपही महिलेने केला आहे. तसेच एक गावकरी म्हणाला की, पंचनाम्यासाठी दोन दिवसानंतर तलाठी तात्या आले आहेत. ते म्हणतात की ज्यांचे अधिकचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे होणार आहेत. मग अशावेळी ज्यांचे कमी नुकसान झालंय त्यांनी काय करायचं? आम्ही आमदार झिरवाळ यांनी पाहणी करून गावकऱ्यांना न्याय दिला असता, पण तेच मतदारसंघात नाहीत, आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा सवाल त्यांनी केला.
आमदार झिरवाळ जपान दौऱ्यावर
एकीकडे पेठ तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला आहे. तालुक्यातील 802 घरांची पडझड झाली आहे. अनेकांचे संसार उघडण्यावर आले आहेत. आशा स्थितीत तालुक्याचे आमदार हायेत कुठं असा सवाल गावकऱ्यांनी विचारला आहे. तर आमदार नरहरी झिरवाळ हे सद्यस्थितीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखा तर्फे ११ ते २३ एप्रिल या कालावधीत जपान या देशामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांसमवेत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने झिरवाळ देखील जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत.