Sudhakar Badgujar: फडणवीसांना भेटताच भाषा बदललेल्या बडगुजरांचा उद्धव ठाकरेंनी विषयच संपवला, प्रेस कॉन्फरन्स सुरु असताना हकालपट्टीचा आदेश आला
Sudhakar Badgujar Expelled from Thackeray Camp: सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज असल्याचं सांगत, महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावा केला होता.

Sudhakar Badgujar Expelled from Thackeray Camp: नाशिक जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची भाषा बदलली होती. मी पक्षात नाराज आहे, असे त्यांनी उघडउघड बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणाच्या रिवाजानुसार सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सुधाकर बडगुजर यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत त्यांना धक्का दिला.
सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी आपण पक्षात नाराज असल्याचे म्हटले होते. त्याच्या आदल्या दिवशीच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. यानंतर बुधवारी सकाळी मातोश्रीवरुन सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा आदेश निघाला. त्यांच्या हकालपट्टीसाठी पक्षविरोधी भूमिका मांडल्याचे कारण देण्यात आले आहे. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड यांनी बुधवारी सकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच त्यांना संजय राऊत यांचा फोन आला. संजय राऊतांनी फोनवरुनच उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीचा आदेश दिल्याचे दत्ता गायकवाड यांना सांगितले. त्यानुसार विद्यमान जिल्हाप्रमुख डी.जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. आमच्याकडे आदेश चालतो, आम्ही पक्षप्रमुखांना प्रश्न विचारु शकत नाही, असे यावेळी डी.जी. सुर्यवंशी यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी तातडीने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करुन पक्षातील नाराजांना थेट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांसह इतर नियुक्त्या झाल्या होत्या. या नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, असे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले होते. त्यामुळे आपण नाराज असल्याचे बडगुजर यांनी सांगितले होते.
Sanjay Raut: कट्टर शिवसैनिक विरोधकांना भेटत नाहीत, अशाने संभ्रम निर्माण होतो: संजय राऊत
सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. कट्टर शिवसैनिक अशाप्रकारे भेटीगाठी घेऊन सहकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत नाही. इच्छा मरणाचा कायदा असतो पण कोणाच्या इच्छा मारण्याचा कायदा आपल्याकडे नाही. नाशिकमध्ये एखाद दुसरा नाराज असेल. लोकांना लाभ हवे आहेत त्यासाठी नाराजी असते. एकनाथ शिंदे सुद्धा आमच्यासोबत असताना नाराज होते आता महायुतीत सुद्धा नाराज आहे. अजित पवार कधीही नाराज दिसत नाहीत. ते कुठेही असो, अजित पवार नाराज नसतात. मी म्हणजे पक्ष नाही, संघटना म्हणजे पक्ष आहे. सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही, ते आमचे पदाधिकारी आहेत. भाजप आणि शिंदे गटाचा अजेंडा आहे पक्ष फोडायचे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
आणखी वाचा























