Nashik News : विनयभंगाचे प्रकरण समोर आणल्याने मास्तरांची उचलबांगडी, मास्तरांची बदली रोखण्यासाठी नाशिकमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले
Nashik News : शिक्षकाची बदली केल्याने संस्थेला जाब विचारण्यासाठी सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
नाशिक : सिन्नर (Sinnar) तालुक्यातील ठाणगावमधील (Thangaon) एका शाळेचे विद्यार्थी (Students) शिक्षकाची बदली (Transfer of teacher) केल्याने रस्त्यावर उतरले आहेत. एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे प्रकरण शिक्षकाने समोर आणले होते. यानंतर शिक्षकाची बदली केल्याने संस्थेला जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी भोर माध्यमिक विद्यालय ठाणगाव येथे एका शिक्षकाची तडकाफडकी बदली करण्यात आली. अशोक कचरे असे या शिक्षकाचे नाव आहे. या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आणले होते. यानंतर शिक्षकाची बदली केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
विद्यार्थ्यांचे शाळा बंद आंदोलन
पुंजाजी भोर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या बदली विरोधात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जाणारा रस्त्या अडवला असून संस्थेने शिक्षकाची बदली का केली? याबाबत जाब विचारण्यासाठी विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले.
तक्रारी असल्यामुळे शिक्षकाची बदली, शाळा व्यवस्थापनाची माहिती
एकीकडे विनयभंगाचे प्रकरण समोर आणलेल्या शिक्षकाची तडकाफडकी बदली केल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. तर दुसरीकडे बदली केलेल्या शिक्षकाविषयी काही तक्रारी असल्यामुळे त्यांची बदली केल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली आहे. आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर शाळा व्यवस्थापन काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या