Nashik Teacher Constituency Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी
Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली होती. तब्बल 24 तासांपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती.
Nashik Teacher Constituency Election: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teachers Constituency) निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) विजयी झाले आहेत. गेल्या 24 तासांपासून मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झालेली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं. पण, अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला.
नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली होती. तब्बल 24 तासांपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी घोषित करण्यात आलं. नाशिक मतदारसंघात ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली होती. पैशांच्या वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली होती. तसेच, स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षानं देखील उमेदवार दिला होता. तसेच, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचं सर्वात मोठं आव्हान किशोर दराडेंसमोर होतं. आतापर्यंत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे यांच्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. पण अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी बाजी मारली असून विजयी झाले आहेत.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत पार पडली.
मतमोजणी प्रक्रियेत आढळल्या जास्त मतपत्रिका
मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळुन आल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळाने मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरु झाली आहे.
मतमोजणी प्रक्रिया कशी?
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 93.48 टक्के मतदान झाले आहे. 64 हजार 848 मतांपैकी वैध मते ठरवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 50 मतांचे गठ्ठे बांधले जातील. त्यानंतर वैध-अवैध मतांची विभागणी होणार आहे. मतांचा कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. याप्रमाणे कोटा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या मतांची उलट्या क्रमाने मतमोजणी होणार आहे. सर्वात अगोदर कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषित केला जाणार आहे.