Shantigiri Maharaj : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज भुजबळांच्या भेटीला, भाजप नेत्याशीही बंद दाराआड खलबतं, चर्चांना उधाण
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज हे आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाने हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी उमेदवारी दिली आहे. तसेच शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) हे अपक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रही होते. मात्र महायुतीकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर महायुतीने शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिलेत.
शांतीगिरी महाराज छगन भुजबळांच्या भेटीला
आता शांतीगिरी महाराज थोड्याच वेळात भुजबळ फार्मवर (Bhujbal Farm) छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. अपक्ष उमेदवार महायुतीच्या नेत्याची भेट घेणार असल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ युतीधर्म पाळत नसल्याचा नुकताच शिवसेना आमदार सुहास कांदेंनी (Suhas Kande) आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शांतीगिरी महाराज आणि भुजबळ यांच्या भेटीत काय चर्चा होते? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
दिनकर पाटील - शांतीगिरी महाराजांमध्ये बंद दाराआड चर्चा
नाशिकचे भाजप पदाधिकारी दिनकर पाटील (Dinkar Patil) हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी जोरदार तयारीला सुरुवातही केली होती. मात्र हेमंत गोडसेंना तिकीट मिळाल्याने दिनकर पाटील हे सध्या नाराज आहेत. आणि अशातच आज सकाळी प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांनी दिनकर पाटील यांची घरी भेट घेतली. विशेष म्हणजे दोघांमध्ये अर्धा तास बंद दाराआड चर्चा देखील झाली.
शांतीगिरी महाराजांची आज पत्रकार परिषद
आज अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2024) मुहूर्तावर दुपारी तीन वाजता शांतीगिरी महाराज नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, शिर्डी, धुळे आणि दिंडोरी या सहा लोकसभा मतदारसंघांसाठी शांतीगिरी महाराज उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. शांतीगिरी महाराज आता कोणत्या पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा