(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Pawar : 'नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेलच', रोहित पवारांचा PM मोदींवर पलटवार
Rohit Pawar : नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण नक्की होणार आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. यावरून आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
Rohit Pawar on PM Narendra Modi : आज नाशिकच्या पिंपळगाव (Pimpalgaon) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये नक्की विलिनीकरण होणार, असे त्यांनी म्हटले. आता यावरून आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार म्हणाले की, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात १३ लाख मतदार कांदा उत्पादक शेतकरी आहेत. त्या व्यतिरिक्त द्राक्ष उत्पादक आणि अन्य उत्पादक वेगळे आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोदींच्या सभेत बंदी केली असेल तर मोदींचा आणि भाजपचा विश्वास मतदारांवर देखील राहिलेला नाहीये.
मोदींच्या पिंपळगावच्या सभेत धुळे, नगरहून लोकं आणली
त्यांना फक्त शो बाजी करायची होती. आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं. मोदींच्या पिंपळगावच्या सभेत धुळे, नगरहून लोकं आणली गेली, असा आरोप रोहित पवार यांनी केला. तर मतदार कमी आणि कार्यकर्ते काही प्रमाणात अशी परिस्थिती मोदींच्या सभेला होती. मोदींच्या आजच्या सभेत कुठेही उत्साह नव्हता, मोदींनी देखील भाषण आवरते घेत तिथून काढता पाय घेतला, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर कळेल
पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर रोहित पवार म्हणाले की, मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचं इथे भलं झाल्याचं आपण पाहिले आहे का? शेतमालाला भाव नाही, बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न देशात मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. 2014 मध्ये मोदींनी सांगितलेली एकही गोष्ट त्यांनी दहा वर्षात पूर्ण केली नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलण्यापेक्षा मोदींनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे बोलायला हवं होतं. नकली कोण आणि असली कोण हे चार तारखेनंतर आपल्याला कळेल. असली लोक हे मतदार आहेत आणि ते असली लोकांच्याच पाठीमागे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीलाच यश मिळेल, असे त्यांनी म्हटले.
सामान्य कुटुंबांना भाजपने अडचणीत आणलं
इंडिया आघाडीचा निवडणुकीत दयनीय पराभव होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. यावर रोहित पवार म्हणाले की, या निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांची अतिशय वाईट परिस्थिती होईल, याची मोदींना भीती वाटते आहे. सर्व्हेमध्ये भाजपची पीछेहाट होतानाच दिसतेय. सामान्य कुटुंबांना भाजपने अडचणीत आणलं आहे. मोदींनी सुरुवात विकासावर केली. नंतर हिंदू मुस्लिमवर आले. नंतर भटकती आत्मावर आले नंतर अदानी अंबानींवर आले. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ते आमच्याकडे या असं सांगतायत, मोदी भरकटत चाललेत. सामान्य लोकांच्या हिताचे मुद्दे त्यांच्या भाषणातून बाजूला पडतायत, अशी जोरदार टीका रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
आणखी वाचा