ठरलं! नाशिकमधून राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून भास्कर भगरे 'या' दिवशी भरणार उमेदवारी अर्ज, महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार
Nashik Lok Sabha : राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे हे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज नेमका कधी दाखल करणार? याबाबत माहिती समोर आली आहे. यावेळी महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित राहणार आहेत.
Nashik Lok Sabha Constituency : एकीकडे नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत (Mahyuti) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजाभाऊ वाजे यांच्याकडून नाशिकमध्ये प्रचाराची एक फेरीदेखील पूर्ण झाली आहे.
तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात (Dindori Lok Sabha Constituency) भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे हे आपला उमेदवारी अर्ज नेमका कधी दाखल करणार? याबाबत माहिती समोर येत आहे.
नाशिकमध्ये 29 एप्रिलला जोरदार शक्तीप्रदर्शन
महाविकास आघाडीचे नाशिकचे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि दिंडोरीचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे जोरदार शक्तीप्रदर्शन करत 29 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut), जयंत पाटील (Jayant Patil) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत. आज नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात याबाबत नियोजन बैठक पार पडली असून या बैठकीला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कौल - विलास शिंदे
यावेळी ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) म्हणाले की, शिवसेना पक्ष फुटीनंतर आम्ही केवळ निवडणुकीची वाट बघत होतो. 29 तारखेला महाविकास आघाडीकडून लाखोंच्या संख्येने लोक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहोत. जनतेच्या मनात राजाभाऊ वाजे यांचे स्थान निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कौल आहे. मतदार केवळ आता 20 मेची वाट बघत आहेत. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत (Election 2024) दाखवली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या जागेवरून पंकजा मुंडे-छगन भुजबळांमध्ये जुंपली
दरम्यान, बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून निवडणुकीसाठी उभं करेल, असे वक्तव्य केले. यावरून महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. तर छगन भुजबळांनी पंकजा मुंडेंनी बीडमध्ये लक्ष द्यावे, आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत, असा टोला लगावला आहे. आता नाशिकमधून महायुतीतून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या