PM मोदींची पिंपळगावला जाहीर सभा होणार; छगन भुजबळांची माहिती, नाशिकच्या तिढ्याबाबतही केलं मोठं वक्तव्य!
Chhagan Bhujbal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 10 मे रोजी पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच नाशिक लोकसभेच्या तिढ्यावरही त्यांनी महत्वाचं भाष्य केलंय.
Chhagan Bhujbal : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व पूर्ण शक्तीने उतरणार आहोत. दोन तारखेला अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहोत. त्याच्या आधी नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होईल. 10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नाशिकच्या पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे.
आज नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज भुजबळ फार्मवर छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळी दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार भारती पवार (Bharti Pawar), नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav), माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर छगन भुजबळ आणि डॉ. भारती पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाशिक-दिंडोरीत ताकतीने उतरणार - छगन भुजबळ
छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्व पूर्ण शक्तीने उतरणार आहोत. दोन तारखेला अर्ज दाखल करण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहोत. तोपर्यंत नाशिकच्या जागेचा उमेदवार देखील कदाचित 1-2 दिवसांत जाहीर होईल. आम्ही पूर्ण ताकदीने दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी जाणार आहोत. तसेच 10 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती त्यांनी येवेली दिली आहे.
...तर मोदीदेखील पवारांवर टीका करणारच - छगन भुजबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुण्यातील सभेत शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. यावर छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, पवार मोदींवर टीका करतायत तर मोदी देखील त्यांच्यावर टीका करणारच आहेत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दोन तारखेला आम्ही अर्ज दाखल करणार
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) म्हणाल्या की, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात त्यांची याआधी देखील त्यांची भेट घेतली होती. विसाकाच्या कामांसाठी त्यांनी नेहमीच दिशा आणि मार्गदर्शन केलंय. दोन तारखेला आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. भुजबळांनी लोकांना भेटा, कांदा प्रश्नांवर लोकांना आपण काय केलंय ते सांगा, अशा सूचना केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : शांतीगिरी महाराजांचे शिष्टमंडळ गिरीश महाजनांच्या भेटीला, नाशिकचा तिढा सुटणार?