PM Narendra Modi Nashik Visit : फुलांची उधळण, ढोल-ताशांचा गजर, नाशिकमध्ये नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो; नाशिककरांकडून जल्लोषात स्वागत
Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकला मोदींचा रोड शो पार पडला. यावेळी नाशिककरांनी जय श्रीरामच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) आयोजनाची जबाबदारी यंदा महाराष्ट्रावर (Maharashtra) सोपवण्यात आली आहे. या महोत्सवाचे आयोजन नाशिकमध्ये (National Youth Festival in Nashik) होत असल्याने शहरात गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा भव्य रोड शो झाला. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (PM Narendra Modi Road Show in Nashik) आतुरतेने वाट पाहत होते.
जवळपास ४० गाड्यांच्या ताफ्यासह मोदींचा भव्य रोड शो झाला. पंतप्रधान मोदींवर नाशिककरांनी फुलांचा वर्षाव केला. यावेळी नागरिकांनी जय श्रीरामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरची सिग्नलपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. जनार्धन स्वामी मठ चौकापर्यंत हा रोड शो करण्यात आला.
ढोल ताशांच्या गजरात मोदींचे स्वागत
एकीकडे नरेंद्र मोदींच्या गाड्यांचा ताफा तर दुसऱ्या बाजूला हजारोंच्या संख्येने नाशिककर उपस्थित होते. पेशवाई पथक, लेझीम, ढोल ताशांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यात आले. यात हजारो युवक-युवतींनी सहभाग घेतला. तसेच ध्वज हातात घेऊन कला सादरीकरण करण्यात आले.
पंचवटीत प्रभू रामाचे दर्शन अन् रामकुंडावर जलपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर असून ऐतिहासिक काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. जवळपास 23 मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतील. त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचा पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण होईल, अशी माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे.
सभास्थळी चोख तपासणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभास्थळी नागरिकांची चोख तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. सभेच्या मैदानात कोणालाही काहीच नेता येणार नाही. पोलीस अंमलदारांकडून धातूशोधक यंत्रांसह कृत्रिमरित्या शारीरिक तपासणी होणार आहे. त्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जाईल.
अतिरिक्त अडीच हजार पोलीस नाशकात दाखल
राज्यभरातून अतिरिक्त पोलीस नाशिकला दाखल झाले आहेत. यामध्ये १३० पोलीस अधिकाऱ्यांसह दोन हजार अंमलदार व राज्य राखीव दलाच्या पाच तुकड्या (एसआरपीएफ), असा सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा नाशिकमध्ये आहे. विविध जिल्ह्यांमधून १३ बॉम्ब शोधक-नाशक पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.
आणखी वाचा
PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या 'रोड शो'साठी पंतप्रधानांची खास गाडी पाहिलीत का?