(Source: Poll of Polls)
Phule Movie : फुले चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप, समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले; हा सिनेमा...
Phule Movie : ब्राह्मण महासंघाने फुले चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. यावर आता छगन भुजबळांनी भाष्य केले आहे.

Chhagan Bhujbal : अनंत महादेवन दिग्दर्शित 'फुले' (Phule) हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या या चित्रपटावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. ब्राह्मण संघटनांकडून पोलीस आणि सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे ‘फुले’ चित्रपटात दाखवण्यात आलेली ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्ये हटवूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता यावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राष्ट्रीय अध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, मला त्याची काही कल्पना नाही. संपूर्ण देशात महात्मा फुले यांचा हिंदी चित्रपट दाखविण्यासाठी तयार करण्यात आला आहे, याचा मला आनंद आहे. यापूर्वी सत्यशोधक चित्रपट आला होता, तसेच आचार्य अत्रे यांनी देखील एक चित्रपट काढला होता. त्याला भारत सरकारचे एक पारितोषिक मिळाले होते. या चित्रपटात काय दाखवले आहे याची मला कल्पना नाही. परंतु चित्रपटात काय दाखवले आहे ते पाहिलं पाहिजे. आता प्रश्न राहिला त्याच्यात ब्राह्मणांना कसं दाखवलं? काय दाखवलं? महात्मा फुलेंनी दलितांना जवळ घेण्याचे काम केले. विशेषतः मुलींना शिक्षणासाठी शाळा काढल्या. त्यावेळी ब्राह्मणांनी जसा विरोध केला, तसा आमच्या बहुजन समाजाने सुद्धा प्रचंड विरोध केला. त्यावेळी अंधश्रद्धा होती आणि ते कर्मठ ब्राह्मण होते. पण त्याच वेळी महात्मा फुलेंनी शाळा काढली, ती प्रथम भिडे ब्राह्मण वाड्यामध्ये होती, असे त्यांनी म्हटले.
हा सिनेमा सगळ्यांनी पाहावा
भवाळकर, परांजपे असे अनेक ब्राह्मण महात्मा फुले यांना पाठिंबा देते, सपोर्ट करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूचे लोक होते. ब्राह्मण आणि बहुजन सपोर्ट पण करत होते आणि काही विरोध पण करत होते. लहुजी साळवे हे आपल्या पैलवानासह शाळा बंद करणाऱ्यांना विरोध करत होते. तर हा संमिश्र भाग आहे आणि हे तर खरंच आहे त्यावेळी खूप दगड मारण्यात आले, खूप विरोध करण्यात आला. मला तर वाटतं हा सिनेमा सगळ्यांनी पाहावा. मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूची त्याला कंगोरे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आणखी वाचा



















