नाशिक-मुंबई महामार्गावर सोमवारी चक्का जाम, ठाकरे गटापाठोपाठ विविध संघटना सरकारला घेरणार
Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गाच्या खड्ड्याच्या प्रश्नावर निमा आयमा या उद्योजक संघटनासह इतर संघटना आक्रमक झाल्या असून सोमवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Nashik News : नाशिक-मुंबई महामार्गाच्या (Nashik-Mumbai Highway) दुरवस्थेकडे तसेच नाशिक शहराच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि. 29) विल्होळीच्या जैन मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने नेऊन रास्ता रोको करण्याचा तसेच त्याबाबत ठोस निर्णय होईपर्यंत टोल न भरण्याचा एकमुखी निर्धार उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, वाहतूक संघटनासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी घेतला आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना आपल्या मागण्यांबाबत पत्र व ट्विट करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. नाशिक महानगरातील उद्योग, व्यवसाय, डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, लेखापरीक्षक, आर्किटेक्ट ट्रान्स्पोर्ट, टुरिस्ट, घाऊक व किरकोळ व्यापारी व सर्वच जवळपास 26 प्रमुख संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार
नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरवस्थेमुळे मालाची ने-आण करणारी अवजड वाहने तर दीर्घकाळ अडवून ठेवली जातात. त्यामुळे उत्पादन आणि आयात-निर्यातीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणीही उपस्थितांनी केली. येत्या 2 ऑगस्टला नाशिकमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचाही निर्णय देखील यावेळी बैठकीत घेण्यात आला आहे.
चार दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने केले होते आंदोलन
पावसाळा सुरु झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दूरावस्था (Potholes) झाली आहे. राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई-नाशिक मार्गावर (Mumbai Nashik High way) तर मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे, यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी दुपटीहून अधिकचा कालावधी लागत आहे. या खड्ड्यांविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. चार दिवसांपूर्वी घोटी टोल नाक्यावर ठाकरे गटाने आंदोलन केले. महामार्गांवरील खड्ड्यांविरोधात ठाकरे गटाने घोटी टोल नाका बंद पाडला होता. आता निमा आयमा या उद्योजक संघटनासह इतर संघटना आक्रमक झाल्या आहेत. ठाकरे गटापाठोपाठ विविध संघटना सरकारला घेरण्याच्या तयारीत असून नाशिक-मुंबई महामार्गावर चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या