Lok Sabha Elections 2024 : दिंडोरी लोकसभेची जागा लढवण्यास राष्ट्रवादी सज्ज, भाजपाच्या भारती पवारांचा पत्ता कट?
Lok Sabha Elections 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निहाय जागांच्या आढावा बैठका मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिलीच बैठक नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची पार पडली.
Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीत अद्याप महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा सुरु आहे. नाशिक (Nashik) आणि दिंडोरीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मतदारसंघावर दावेदारी सुरु आहे. मात्र नाशिक आणि दिंडोरीची (Dindori) जागा नेमकी महायुतीत कुणाच्या वाटेला येणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निहाय जागांच्या आढावा बैठका मुंबई येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. पहिलीच बैठक नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची पार पडली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष समीर भुजबळ (Sameer Bhujbal), मंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) हे उपस्थित आहेत.
दिंडोरी लोकसभा लढवण्यास राष्ट्रवादी सज्ज
या बैठकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली आहे. बैठकीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास त्या ठिकाणाहून लढण्यासाठी सज्ज असल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कांदा प्रश्नावरून सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात नाराजी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार निवडून येण्यास मदत होऊ शकते, असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
भाजपच्या भारती पवारांचा पत्ता कट?
सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार शिवसेना एक आणि भाजप एक आमदार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून सध्या डॉक्टर भारती पवार भाजपच्या खासदार आहेत. भारती पवार यांच्या विरोधात नाराजी असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे आता महायुतीत दिंडोरीची जागा कुणाला मिळणार? भाजपच्या भारती पवारांचा पत्ता कट होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता
निवडणूक जसजशी डोळ्यासमोर येत आहे. तसतशी नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. जागा वाटपाचा तिढा अधिकाधिक वाढत चालला आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून अनेक उमेदवार इच्छुक म्हणून दावा करत आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिक लोकसभेवरून ठाकरे गट आणि शरद पवार गटात राडा झाला होता. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेवरून महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा