नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता, महायुती अन् मविआच्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे.
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराची आज सांगता होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या निवडणुकीसाठी (Elections 2024) दौरे करून प्रचार केल्याने नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे अपक्ष निवडणूक लढवत आहे. नाशिकच्या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कोण मारणार बाजी?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे नाशिकची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तर नामसाध्यर्म असणारे उमेदवार, बोगस मतदार, मतदारांना आमिष दाखविण्याचे आरोप, अशा विविध कारणांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हानिहाय मतदार संख्या
नंदुरबार :- 5 हजार 393
धुळे :- 8 हजार 159
जळगाव :- 13 हजार 122
अहमदनगर :- 17 हजार 392
नाशिक :- 25 हजार 302
एकूण मतदार :- 69 हजार 368
सुषमा अंधारेंचा आरोप
महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत केला. मात्र सुषमा अंधारेंचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेने फेटाळला आहे.
हेरंब कुलकर्णींचा दावा
साने गुरुजी ज्या भागात शिक्षक होते त्याच नाशिक शिक्षक मतदारसंघात आज महिलांना नथ तर पुरुष मतदारांना मतदानासाठी किंमती वस्त्र देण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) तात्काळ याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Dada Bhuse : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसेंची गाडी अडवली; नेमकं घडलं तरी काय?