Nashik Rain : संततधार पावसाने गोदामाई खळाळली, 'या' धरणांमधून विसर्ग, नाशिकला आज ऑरेंज अलर्ट
Nashik Rain Update : शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे.
नाशिक : शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. दारणा, नांदूरमध्यमेश्वर, कडवातून विसर्ग सुरू झाला आहे. काल दिवसभर पावसाने शहरात मुक्काम ठोकला. दोन महिन्यांत पहिल्यांदा खऱ्या अर्थान पावसाळा जाणवला.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात 72.50 टक्के जलसाठा झाला आहे. चार ते पाच तालुक्यांत पावसाने जोर घेतल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. भावली धरण तुडुंब भरले आहे. काल दिवसभर पाऊस अधुनमधून सुरु होता. काल दिवसभरात 15.2 मि.मी झाला. पावसाची संततधार असल्याने कुठलाही दुर्घटना झाली नाही. मात्र चौका चौकात वाहतूक कोंडी मात्र जाणवत होती.
गोदामाई खळाळली
संततधार पावसामुळे नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. रामकुंडावरील अनेक छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून गोदाकाट परिसरातील दुकाने हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या धरणांतून विसर्ग सुरु
दारणा धरणातून शनिवारी 19 हजार 972 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. तर नांदूर मध्यमेश्वरमधून 33 हजार 576, पालखेड मधून 2 हजार 131, कडवा धरणातून 3 हजार, पुनद धरणातून 5 हजार 440 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिकला आज ऑरेंज अलर्ट
रविवारीही पावसाचा मारा कायम राहणार असून, हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे, तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गंगासागर तलाव भरला
त्र्यंबकेश्वर येथे संततधार सुरू असल्याने गंगासागर तलाव भरून ओसंडत आहे. तर परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. येथील अहिल्या, अंबोली, बेझे धरण भरल्याने जादा पाणी गंगापूर धरणाकडे प्रवाहित झाले आहे. त्यामुळे गंगापूर धरणाची पाणीपातळी वाढल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
नार, पार नद्यांना पूर
सुरगाणा येथे शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला असल्याने नार, पार, मान, तान आणि अंबिका नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी सांडवा पूल पाण्याखाली गेले. तर काही ठिकाणी जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर पिंपळसोंड गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे.
आणखी वाचा