Nashik Rain Update : नाशिकचा पाणी प्रश्न सुटला, मात्र जिल्ह्याचं काय? अजूनही पाच धरणे 50 टक्क्यांच्या खाली, तीन धरणे शुन्यावर
Nashik Dam Storage : नाशिक जिल्ह्यावर (Nashik District) पाऊस रुसला की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यावर (Nashik District) पाऊस रुसला की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरु असल्याने काही अंशी थेंबे थेंबे का होईना गंगापूर धरणातील पाणीसाठा 91 टक्क्यावर पोहोचला असून त्यामध्ये गतवर्षीपेक्षा चार टक्क्यांनी घट असल्याचे चित्र आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांश धरणे अद्याप पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असून गतवर्षांपेक्षा तब्बल 28 टक्के उपयुक्त पाणीसाठा अजूनही कमीच आहे.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात जूनच्या अखेरीस सुरु झालेल्या पावसाने नंतर उघडीप दिली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याची 18 तारीख उलटूनही अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. नाशिक शहरातील महत्वपूर्ण नदी गोदावरी (Godavari) एकदाही खळखळून वाहिलेली नाही. पावसाचा हंगाम सुरू होऊन अडीच महिने उलटूनही जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरू शकली नाहीत. 65 हजार 664 दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची साठवून क्षमता असली तरी सद्यस्थितीत या धरणांमध्ये 42 हजार 485 दशलक्ष घनफूट म्हणजे एकूण क्षमतेचे 65 टक्केच पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत 60 हजार 978 दशलक्ष घनफळ म्हणजे 93 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.
नाशिक शहरात या हंगामात जोरदार असा पाऊस (Nashik Rain) फारसा झाला नाही. कालपर्यंत शहरात 253.6 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या चार तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मात्र आठवडाभरापासून या तालुक्यांमध्येही पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली आहे. यामुळे जिल्ह्याला पुन्हा मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सुदैवाने गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर, पालखेड, पुणेगाव, केळझर, कडवा या धरणात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु उर्वरित धरणांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धक्कादायक म्हणजे अजूनही तिसगाव, नागासाक्या, माणिकपूंज ही धरणे कोरडीच असून त्यामध्ये पाणीच उपलब्ध होऊ शकले नाही, जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेले गिरणा धरण गतवर्षी आत्तापर्यंत 93 टक्के भरले होते, यांना त्यात केवळ 37 टक्के पाणीसाठा आहे.
असा आहे आजपर्यंतचा जलसाठा
नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा वाढू लागल्याने नाशिककरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. आजपर्यंत गंगापूर धरणात फक्त 91 टक्के पाणीसाठा सध्या आहे. कश्यपी धरणात 59 टक्के, गौतमी धरणात 58 टक्के, पालखेड धरण 44 टक्के, पुणेगाव धरणात 92 टक्के पाणीसाठा आहे. तर दारणा धरणामध्ये 94 आणि भावली 100 टक्के एवढा पाणीसाठा आहे, वालदेवी 100 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 100 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के असा धरणसाठा उपलब्ध आहे. तर दारणा धरणातून 550 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे. वालदेवी 65 क्युसेक, नांदुरमध्यमेश्वर 151 क्युसेक इतक्या वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.
इतर महत्वाची बातमी :