Nashik Rain Update : नाशिकमध्ये पावसाची संततधार, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून संततधार पावसाने (Rain) हजेरी लावली असून, ग्रामीण भागासह शहरातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून, गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वर यांसारख्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात सतत जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे, दुपारी 2 वाजेपासून धरणातून 6,160 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी या धरणातून 4 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास, पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गोदावरीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ
गंगापूर धरणातून वाढत्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, रामकुंड परिसरातील पूल आणि छोटे-मोठे मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पाहायला मिळत आहे. गोदावरीच्या पुराचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक आपत्कालीन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आल्या आहे.
दिंडोरीत पावसाची दमदार हजेरी
दरम्यान, मे महिन्यात ऐन शेतीच्या मशागतीच्या वेळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेती व्यवसायाचे गणित बिघडवून टाकले होते. टोमॅटो लागवड व इतर धान्य उत्पादनासाठीच्या कोलमडलेल्या नियोजनातून सावरण्याच्या भूमिकेत शेतकरी वर्ग असताना दिंडोरी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संततधार पावसामुळे तालुक्यातील काही प्रमाणात धरण साठ्यात वाढ झाली आहे. द्राक्ष, टोमॅटो, कांदा, सोयाबीन, भात व भाजीपाला असे बहुविध कृषी उत्पादन दिंडोरी तालुक्यात घेण्यात येते. त्यासाठी मे महिन्यात शेती मशागत व उत्पादनापूर्वी प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांचे नियोजन असते.
पेरणीची कामे रखडली
मात्र, मे महिन्यात बेमोसमी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे शेती मशागत खोळंबली. संभाव्य उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होईल अशी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. भविष्यकालीन आर्थिक नुकसानीचे गणित आखताना सध्या दिंडोरी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहे. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दोन ते तीन दिवसांपासून पावसाने संततधार सुरु असल्याने पेरणीचे कामे रखडलेली आहे.
आणखी वाचा
पुढील 24 तासांत राज्यात पावसाचे तीव्र अलर्ट; किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढणार, कुठे काय इशारे?






















