Nashik News : शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने, शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार
Nashik News : नाशिक शहरातील देवळाली गाव परिसरात शिंदे गट आणि ठाकरे गटात गुरुवारी बाचाबाची झाली. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार केला.
Nashik News : नाशिक शहरातील देवळाली (Deolali) गाव परिसरात शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटात (Thackeray Group) गुरुवारी (19 जानेवारी) सायंकाळी बाचाबाची झाली. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकारी सूर्यकांत लवटे (Suryakant Lavte) यांच्या मुलाने थेट बंदूक काढत हवेत गोळीबार (Firing) देखील केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या देवळाली गाव परिसरात पारावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदावरुन चर्चा सुरु असतानाच शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या समर्थकांमध्ये वाद झाले. यावेळी स्वप्निल सूर्यकांत लवटे याने हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज येताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, भीतीपोटी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली होती.
हवेत गोळीबार केल्याचं समजताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी संशयित स्वप्निल लवटेला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निल लवटे हा शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटे यांचा पुतण्या देखील आहे.
मागील महिन्यातच शिंदे गटात प्रवेश
महत्त्वाचं म्हणजे गेल्याच महिन्यात माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांच्यासह नाशिकमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. संजय राऊत नाशिक दौऱ्यावरुन परत येताच या नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. संजय राऊत यांनी पंधरा दिवसांच्या अंतरावर दोन वेळा नाशिक दौरा करुनही पदाधिकारी आणि नगरसेवकांना रोखण्यात यश आलेलं नाही. संजय राऊत माघारी फिरत असताना ठाकरे गटाला हे खिंडार पडल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.
ती गोळी सदा सरवरणकर यांच्या बंदुकीतून?
याआधी शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील प्रभादेवी इथे गणेश विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाली होती. त्याचवेळी गोळीबारही झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. त्यातून गुन्हेही दाखल झाले होते. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होता. सरवणकर यांच्याविरोधात 15 सप्टेंबर रोजी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, ती गोळी माझ्या पिस्तुलातून सुटलीच नव्हती, असा दावा सदा सरवणकर यांनी केला होता. मात्र ही गोळी एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याच पिस्तुलातून सुटल्याचं बॅलेस्टिक अहवालातून समोर आलं आहे.