Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 20 एकरवरील बटाटा झाला खराब, बांधावर कुणीच आलं नाही, शेतकऱ्यास अश्रू अनावर
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) 2 हजार 598 हेक्टर वरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे.
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात 17 मार्च रोजी एकाच दिवशी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) 2 हजार 598 हेक्टर वरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्हा कृषी विभागाच्या (Agriculture Department) प्राथमिक अहवालात आकडेवारी आली समोर आहे. एकीकडे शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत असतांना दुसरीकडे सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले असल्याचे चित्र आहे.
नाशिक (Nashik News) जिल्ह्यात शनिवारी सलग पाचव्या दिवशी अवकाळी पाऊस (Rain) आणि गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामानासह सायंकाळी अवकाळी पावसाचे आगमन होत आहे. यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. शनिवारीदेखील नाशिकसह जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावत गारपीट झाली. या गारपिटीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसला असून अनेक भागात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात जवळपास एकाच दिवसात जिल्ह्यातील 2 हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी काल उशिरा नियोजित कार्यक्रम रद्द करत नुकसान ग्रस्त भागात दौरा केला. या ठिकाणी त्यांनी तात्काळ नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर काल नाशिकमध्ये असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अवकाळी पावसामुळे जेवढे नुकसान होईल, तेवढी भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र काही भागात अद्यापही अधिकारी पोहचले नसल्याचे चित्र आहे. कुठलेही अधिकारी, तलाठी, कर्मचारी पाहणी करण्यास येत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार असल्याचे समोर आले आहे.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भात अनेक भागातील परीस्थिती वाईट असून सलग दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिकच्या लहवीत परिसरातील मुठाळ कुटुंबियाचा तब्बल 20 एकरवरील बटाटा पूर्ण खराब झाला आहे. बटाटा हिरवा पडून त्यावर मोड आले असून फोन करून पण तलाठी किंवा कोणीच पाहणी करायला येत नसल्याचं शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितल आहे. तर शेतकऱ्यावर खूप वाईट दिवस आल्याचं कॅमेरासमोर सांगतांना राणी मुठाल या शेतकरी महिलेला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
द्राक्षबागांवर परिणाम....
अवकाळीच्या वातावरणाने द्राक्षबागांवर गारांच्या तडाख्याने घडांना तडे गेले आहेत. कांदा, गहू, द्राक्ष आदी पिके भुईसपाट होण्याच्या मार्गावर आहेत. निफाडमध्ये 24 हेक्टर कांदा, एक हेक्टर गहू, तर प्रत्येकी दोन हेक्टरवर फळपीक व मक्याचे नुकसान झाले आहे. मनमाड येथे सलग तिसऱ्या दिवशी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. येवला तालुक्यात रब्बी हंगामातील अनेक पिकांची नासधूस झाली. अर्धा तास झालेल्या पावसात कुठे दहा मिनिटे, तर कुठे पंधरा ते वीस मिनिटे गारांचा तडाखा बसला.