Shirdi Saibaba: घरात मुलगी नाही म्हणून शिर्डीच्या कोते कुटुंबीयांनी सव्वा रुपयांत दोन हजार मुलींची लग्न लावली...!
Shirdi Saibaba : शिर्डीतील कैलास कोते (Kailas Kote) कुटुंबीय गरीब घरातील मुलींसाठी आधार ठरले आहेत.
Shirdi Saibaba : आजही लग्न म्हटलं की, अव्वाच्या सव्वा खर्च केला जातो. मात्र अनेक कुटुंबीय अगदी साध्या पद्धतीने लग्न करत मुलीला सासरी पाठवितात. हाच अव्वाच्या सव्वा खर्च टाळून शिर्डी (Shirdi) येथील कोते कुटुंबीय आदर्श ठरले आहे. अवघ्या सव्वा रुपयांत मुलींचे लग्न पार पाडत असल्याची परंपरा गेल्या 23 वर्षांपासून सुरू ठेवली आहे. आतापर्यंत त्यांनी जवळपासून दोन हजारांहून अधिक मुलींचे विवाह संपन्न केले आहेत. तर कालच शिर्डीत 65 जोडप्यांचे विवाह थाटामाटात संपन्न झाले.
शिर्डी म्हटलं की, साईबाबांची (Saibaba) नगरी. लाखो भाविक साईच्या दर्शनासाठी शिर्डी दरबारी माथा टेकवतात. याच शिर्डीतील कैलास कोते (Kailas Kote) आणि त्यांचे कुटुंबीय गरीब घरातील मुलींसाठी आधार ठरले आहेत. गेल्या 23 वर्षांपासून साईंच्या शिर्डीत आपल्याला मुलगी नसतानाही कन्यादान करण्याचं स्वप्न मनाशी बाळगून आतापर्यंत 2000 हून अधिक मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न केले आहेत. दरवर्षी साई चैरीटेबल ट्रस्टच्या (Sai Charitable Trust) माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळा पार पाडत असून काल झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात राज्यभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या 65 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले.
शिर्डी शहरातील कैलास कोते यांनी अठरा वर्षापूर्वी सामुदायिक विवाह सोहळा (Samudayik Vivah Sohla) करण्याच मनाशी ठरवत सामुदायिक विवाह सोहळा संकल्पना सुरु करत साई चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला. या अंतर्गत गेल्या 23 वर्षापासून सुरु असलेल्या सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यात अवघा सव्वा रुपया घेत आतापर्यंत 2000 हून अधिक सोहळे पार पाडत कन्यादान केलं आहे. साईंच्या शिर्डीत काल संपन्न झालेल्या विवाह सोहळ्यात 65 जोडपे विवाहबद्ध झाले आहेत.
राज्यभरातून आलेल्या वऱ्हाडी मंडळाची रेलचेल आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा दिमाखदार सोहळ्यात हा विवाहसोहळा संपन्न झाला. कोते दाम्पत्याकडून केवळ लग्नच लावून दिले जात नाही तर जोडप्यांना जर मुलगी झाली तिच्या नावे दहा हजार रुपयांची पावती बँकेत करण्यात येते. ज्यांना आधार नाही अशांना साईंचा संदेश घेत आधार देण्याचा छोटा प्रयत्न करीत असल्याची भावना कैलास कोते यांनी बोलून दाखविली. तर 23 वर्षात 2000 मुलींचे कन्यादान करण्याचं भाग्य मिळालं याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुमित्रा कोते यांनी दिली आहे. या सोहळ्याच्या वेळी हुंडा विरोधी प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले होते. इंग्लंड येथील वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड या संस्थेने या विवाह सोहळ्याची दखल घेत कोते दाम्पत्याला प्रमाणपत्र दिले.
सामुदायिक सोहळा आदर्शदायी...
एक लग्न करायचं म्हंटल की, मोठा खर्च शेतकऱ्यासमोर उभा राहतो, कर्जबाजारी होऊन हे लग्न करण्याची वेळ अनेकदा येते. अशावेळी आम्हाला मुलगी नसल्यानं हा निर्णय घेतला आणि 23 वर्षात 2000 मुलींचे कन्यादान करण्याचं भाग्य मिळालं असल्याचे सुमित्रा कोते म्हणाल्या. सामुदायिक विवाह सोहळ्यांना बळ देण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून वधूवरांना आशीर्वादही दिले. तर यावेळी सोहळ्या उपस्थित असलेले राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, इंग्लड येथील वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड या संस्थेने विवाह सोहळ्याची दखल घेत कोते दाम्पत्याला प्रमाणपत्रसुध्दा दिले आहे. सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचं असून कोते दाम्पत्यांनी सुरु केलेला उपक्रम राज्यातील अनेका समोर आदर्श निर्माण करणारा असल्याचे ते म्हणाले.