(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करणारे नाशिकचे मनसे नेते सलीम शेख उत्तर सभेत भाषण करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेतील महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकचे मनसे नेते सलीम शेख भाषण करणार आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर सलीम शेख यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तर सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे विरोधकांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. या उत्तर सभेतील महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकचे मनसे नेते आणि माजी नगरसेवक सलीम शेख भाषण करणार आहेत. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदी, भोंगे तसंच मदरशांमधील गैरप्रकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. राज यांच्या भाषणावर नाराजी व्यक्त करत पुण्यातील मनसेच्या काही मुस्लीम नेत्यांनी राजीनामे देखील दिले होते.
त्याउलट मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर सलीम शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. पुण्याच्या वसंत मोरे यांनी विरोध केला असताना सलीम शेख राज ठाकरे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं होतं. त्यामुळे सलीम शेख यांच्यावर समाजातून मोठा दबाव आला. धमकीचे फोन आले होते. या विरोधाला झुगारुन सलीम शेख आपली भूमिका ठाण्याच्या सभेत मांडणार आहेत.
सलीम शेख यांच्यावर मुस्लीम समाजाची नाराजी
सलीम शेख यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत मुस्लीम बांधवांची नाराजी ओढवून घेती होती. नाशिकसह इतर जिल्ह्यातील मनसेच्या मुस्लीम नेत्यांनी राजीनामा दिला. परंतु सलीम शेख यांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलं. यानंतर सलीम शेख यांचा निषेध करणारे फलक लावण्यात आले. शिवाय व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये जामनेरमधील तरुण आणि सलीम शेख यांच्यातील संवादाची ही ऑडिओ क्लिप असून संबंधित तरुण त्यांना तुम्ही मुस्लीम असूच शकत नाी, डीएनए टेस्ट करुन घ्या, असा सल्ला दिला होता.
त्यामुळे आजच्या उत्तर सभेत राज ठाकरे यांच्यासोबतच सलीम शेख काय बोलणार याचीही उत्सुकला आहे.
राज ठाकरेंची उत्तर सभा, राज्यभरात उत्सुकता
राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार आहे.गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावर केलेल्या भाषणाचे पडसाद अद्यापही कायम असताना उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मूस रोड इथे राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. रात्री साडेसातच्या सुमारास राज ठाकरे बोलायला सुरुवात करतील. खरंतर राज ठाकरे यांची ठाण्यातील उत्तरसभा ही 9 एप्रिल रोजी होणार होती. परंतु तलावपाळी या ठिकाणी सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेने पोलिसांना दिला होता. पण या ठिकाणी 9 तारखेला होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे ही सभा आता 12 तारखेला म्हणजेच आज होणार आहे.
दरम्यान या उत्तरसभेत राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी 200 बाईक्स असतील. तसंच मनसैनिक 60×40 फुटांचा हनुमानाचा झेंडा पालघरवरुन आणणार आहेत. तर नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते सभेसाठी ठाण्यात येणार आहेत.
उत्तर सभेत राज ठाकरे काय बोलणार?
या उत्तर सभेतील भाषणात राज ठाकरे मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, शरद पवार, एसटी आंदोलन अशा अनेक मुद्द्यांवर बोलण्याची शक्यता आहे. गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात मशिदींवरील भोंग, मदरशांमधील गैरप्रकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण चांगलंच तापलेलं आहे. शिवाय त्या भाषणात महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्याची कास धरल्याचं स्पष्ट झालं आहे.आता या उत्तरसभेत राज ठाकरे कोणता मुद्दा मांडणार हे पाहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या: