Nashik Onion : नाशिकच्या जानोरी कस्टम ऑफिसबाहेर कांद्याचे कंटनेर उभेच, या मालावरही 40 टक्के निर्यात शुल्क लागणार का?
Nashik Onion Issue : नाशिकला जानोरी (Janori) येथील कस्टम ऑफिस बाहेर शेकडो कंटेनर्स उभे असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जात आहे.
नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर (Onion Export) केंद्र 40 टक्के निर्यातशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला खरा पण या निर्णयाआधीच अनेक व्यापाऱ्यांचा माल निर्यातीसाठी रवाना झालेला होता. तसेच रविवारी सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे मुंबई जेएनपीटी पोर्ट (Mumbai JNPT Port) बाहेर, तसंच नाशिकला जानोरी (Janori) येथील कस्टम ऑफिस बाहेर शेकडो कंटेनर्स उभे असल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून दिली जात आहे. या कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागणार का? पुढे काय दर या कांद्याला मिळणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यातशुल्क (Export Duty On Onion) आकारल्यानंतर नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून शनिवारी उशिरा अधिसूचना जाहीर झाल्यानंतर शेतकरी, व्यापारी, निर्यातदार या सर्वांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांमध्ये (Onion Farmers) संतापाचे वातावरण असून अशा प्रकारे निर्यातशुल्क लागू झालं तर व्यापारी आपला माल निर्यात करणार नाही, त्यामुळे साहजिकच बाजारात आवक वाढणार आहे. याचाच परिणाम कांद्याच्या दरावर होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. दरम्यान उभ्या असलेल्या कंटेनर्स संदर्भात स्पष्टता किंवा माहिती निर्यातदार किंवा व्यापारांना दिली जात नसल्यामुळे संभ्रमावस्था कायम आहे. या एका कंटेनरमध्ये तीस हजार किलो कांद्याचा माल असतो, यावरून किती कांदा निर्यातीसाठी थांबला गेला, याचा अंदाज येऊ शकतो.
दरम्यान केंद्राने अधिसूचना जारी करण्यापूर्वी अनेक कंटेनर्समधून कांदा हा रवाना झालेला होता. मात्र हे सर्व कंटेनर आता मुंबईच्या जेएनपीटी आणि नाशिकजवळील जानोरी येथील कस्टम कार्यालयाबाहेर उभे करण्यात आलेले आहेत. पुढील कार्यवाहीसाठी कोणतेही स्पष्टीकरण त्यांना दिले जात नसल्याने कंटेनर्समध्ये असलेल्या मालाला नवीन निर्यात शुल्क लागणार का? सदर मालाला कुठला दर मिळणार, याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही. आता नक्की या मालाचं काय करायचं? असं प्रश्न देखील उपस्थित होत आहे. निर्यात दाराने दिलेल्या माहितीनुसार अनेक कंटेनर हे आता परत आले असून अशा पद्धतीने हे कंटेनर्स उभेच राहिले आणि कुठले स्पष्टीकरण यावर मिळाले नाहीतर हा कांदा खराब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनेक प्रश्न हे व्यापाऱ्यांसमोर उभे राहिलेले आहेत.
केंद्राची पुढील भूमिका महत्वाची
लासलगावच्या बाजार समिती आवारात काल याबाबत बैठक झाली. यात पुढील काही दिवस कांदा लिलाव होणार नसल्याचे सांगितले जात आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक हे कांद्याचे आगार हे समजलं जातं. एकूण 15 बाजार समित्या नाशिक जिल्ह्यामध्ये असून जर आज कांद्याचे लिलाव जर झाले नाही तर कांदा व्यवहारावर कदाचित मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, कृषी मंत्री यांनी म्हटले की आम्ही केंद्राकडे याबाबत चर्चा करू, फेरविचार करायचा विचार करू, त्यामुळे असा काही निर्णय आहे तो घेतला जातो का? केंद्राच्या पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाची बातमी :