Nashik News : नाशिकमध्ये हायटेक कॉपी सुरूच! सॅन्डल आणि बनियनमध्ये आढळलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस, लिपिक परीक्षेतील प्रकार
Nashik News : परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेसाठी आलेला एक परिक्षार्थी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना टीसीएसआयओएन संस्थेचे सुरक्षा रक्षक यांच्याकडून तपासणी सुरु असताना संशयास्पद आढळून आला.
नाशिक : नाशिकमध्ये तलाठी भरती परीक्षेत (Talathi Exam) झालेले हायटेक कॉपी प्रकरण चांगलंच गाजले. या प्रकरणातील संशयिताने वनरक्षक भरतीतही गैरप्रकार केल्याचे त्यानंतर समोर आले. अशातच हायटेक कॉपीचा आणखी एक प्रकरण नाशिकमधून (Nashik) समोर आले आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदासाठी होत असलेल्या ऑनलाईन परीक्षेत (Online Exam) सॅन्डल आणि बनियनमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लपवून परीक्षा देणाऱ्या (Hightech Copy Case) एका उमेदवारास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकाराने पुन्हा खळबळ उडाली आहे.
नाशिकमध्ये (Nashik) काही महिन्यापूर्वी तलाठी परीक्षेत छत्रपती संभाजीनगर (Chatrapati sambhajinagar) येथील गुसिंगे नावाच्या संशयिताने हायटेक कॉपी प्रकरण (Talathi Exam copy) घडवून आणले होते. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली होती. यांनतर पुन्हा नाशिक शहरात असाच प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरात कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपिक पदासाठी (Senior Clerk) परीक्षा सुरु आहेत. शहरातील पुणे विद्यार्थी गृह (Pune Vidyarthi Gruh) परीक्षा केंद्राबाहेर हा प्रकार घडला आहे. हा तरुण परीक्षेसाठी आत जात असताना सर्व उमेदवारांची तपासणी सुरु होती. याच अंगझडतीदरम्यान या तरुणाकडे इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस आढळून आले. तात्काळ म्हसरूळ पोलिसांनी (Mhasrul Police) घटनास्थळ गाठत संबंधित उमेदवाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाकडुन कृषी विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी महाराष्ट्रात वेग-वेगळ्या केंद्रात ऑनलाईन परीक्षा सुरु आहेत. अधिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील पुणे विद्यार्थी गृह या परीक्षा केंद्रावर कृषी विभागाच्या वरिष्ठ लिपीक पदासाठी ऑनलाईन परीक्षा 22 सप्टेंबर रोजी 12.30 ते 2.30 या वेळेत सुरू होती. याच सुमारास परीक्षा केंद्रामध्ये परीक्षेसाठी आलेला एक परिक्षार्थी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना टीसीएसआयओएन संस्थेचे सुरक्षा रक्षक यांच्याकडून तपासणी सुरु असताना संशयास्पद आढळून आल्याने तो तेथून पळून जात होता. यावेळी त्यास सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सॅण्डचे तळव्याखाली आढळून आले. तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस लपविण्यासाठी एक सॅण्डो बनियानच्या आतून पॉकेट व प्रश्नांचे फोटो काढण्यासाठी पॉकेटला छिद्र असलेले मिळून आले.
म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल
सदर उमेदवाराचे नाव सुरज विठ्ठलसिंग नारवाल असून जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील नारवालवाडी येथील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले आहे. या उमेदवाराकडील मोबाईल फोनमध्ये कॉपी करण्यासाठी हायटेक हिडन सॉफ्टवेअर मिळून आल्याने परीक्षा विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी म्हसरूळ पोलीसांना माहिती दिली. त्यानुसार संबंधित उमेदवारावर गुन्हा दाखल केला आहे. गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून वेळीच प्रतिबंध केल्यामुळे सामान्य विदयार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे ऑनलाईन परिक्षांमध्ये गैरमार्गाचा अवलंब केल्यास वरीलप्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल होवुन विद्यार्थी हे शासकीय व खाजगी नोकरीची संधी कायमची गमावून बसतात. अशा प्रकारामुळे प्रामाणिकपणे मेहनत व परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. परीक्षार्थीनी अशा शॉर्टकट मार्गाचा अवलंब करून अमिषाला बळी न पडता प्रामाणीकपणे अभ्यास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :