Nashik Bus Service : मराठा आंदोलनाची धग, नाशिकहून मराठवाडयात जाणारी लालपरी थांबली, प्रवाशांचे हाल, सकाळपासून बस बंद!
Nashik News : नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
नाशिक : मराठा आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असून राज्यातील अनेक जिल्ह्यात बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातही बससेवा बंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये देखील आंदोलनाचे तीव्र उमटण्याची शक्यता लक्षात घेत नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या बससेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आज सकाळपासून मराठवाड्याकडे धावणाऱ्या बसेस फेऱ्या रद्द करण्यात आली असून यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा परिणाम राज्यातील एसटी महामंडळाच्या बससेवांवर जाणवू लागला आहे. कालपासून मराठवाड्यातील एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नाशिकमधूनही मराठवाड्याकडे जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून एकही बस छत्रपती संभाजीनगर, जालनाच्या दिशेनं गेल्या नाहीत. तसेच मराठवाड्याकडून नाशिकला एकही बस मुक्कामी अली नसल्याचे एसटी महामंडळ वाहतूक नियंत्रकाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत असून आज सकाळपासून नाशिकच्या ठक्कर बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या आंदोलनाचा एसटी महामंडळाच्या बससेवावर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे नाशिकहुन मराठवाड्यात जाणाऱ्या बसे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर मराठवाडातुन एकही बस नाशिक मुक्कामी आली नाही. नाशिक डेपोतुन 12 बस संभाजीनगरच्या दिशेने जातात. संभाजीनगरहुन साधारणपणे 20 बस नाशिकला येतात. तर जालना, वाशीम अशा इतर डेपोच्या साधारणपणे 25 बसही आल्या नाहीत. त्यामुळे खासगी बस, रेल्वे किंवा खाजगी वाहतुकीचा प्रवाशांना आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे बससेवा कधी सुरळीत होणार याबाबत एसटी महामंडळ अधिकाऱ्यांकडे कोणतीही माहिती नाही. तसेच बससेवा बंद का? याबद्दल प्रवाशांना कुठलीच ठोस माहिती नाही, त्यामुळे बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून, याचे पडसाद नाशिकमध्ये देखील पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील असंख्य गावात राजकीय नेत्यांना गावबंदी तर उपोषण सुरु करण्यात येत आहेत. असं असताना राज्यातील काही भागात मात्र आंदोलनांचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळरात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिली होती. तर, रविवारी पुन्हा एक बसवर दगडफेक करण्यात आली. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केल्याचे देखील समोर आलं. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झाल्याने खबरदारीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता नाशिक डेपोतून सुटणाऱ्या मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.