Nashik News : नाशिकमध्ये रेल्वे ई-तिकीटांचा काळाबाजार, सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूटमार, आरपीएफकडून कारवाई
Nashik News : नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोलिसांनी रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या संशयिताचा पर्दाफाश केला आहे.
नाशिक : नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोलिसांनी रेल्वे ई -तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या संशयितांचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नाशिकमधील एका संशयितांस आरपीएफने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. तपासातून सुमाराने 30 हजार रुपयांची 20 तिकिटे संशयितांकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. प्रवाशांनी रेल्वेचे तिकीट काढताना अनुचित प्रकार तर नाही ना याची खात्री करावी, असे आवाहन रेल्वे सुरक्षा बल पोलिसांकडून करण्यात आले आहे.
एकीकडे गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरु झाला असून रेल्वेने गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय आता सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने प्रवाशांची संख्या वाढणारच आहे, त्यामुळे तिकीट खरेदी मुबलक प्रमाणात होणार आहे. सणासुदीचे दिवस असल्याने रेल्वेगाड्याचे आरक्षण फुल्ल आहेत. अनेक प्रवासी कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी धडपडत असतात. मात्र बाजारात रेल्वे ई तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे रेल्वे पोलिसांच्या (Nashik) निदर्शनास आले आहे. गरजू प्रवाशांना हेरून फसवणूक करणारा इसम रेल्वे सुरक्षा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिक महम्मद नाईक असे संशयिताचे नाव आहे.
रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील सायबर सेलकडून Cyber Cell) याबाबत पोलिसाना माहिती मिळाली. त्यानुसार 'आरपीएफ'चे उपनिरीक्षक रवींद्र कुमार, कर्मचारी विशाल पाटील व सहकाऱ्यांनी भद्रकाली पोलिसांच्या मदतीने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्या संतोष कमलेश अहिरे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. अहिरे यांना डेटामध्ये दिलेला वैयक्तिक वापरकर्ते आयडी आणि ई- तिकिटाबद्दल चौकशी केली. अहिरे यांनी सांगितले, की वापरकर्त्याच्या आयडीवरील एक आयडी त्यांचा होता, ज्यावरून त्यांनी आईला ई-तिकीट दिले होते. सहकारी रफिक महम्मद नाईक तेच तिकीट काढून कमिशनसाठी गरजू प्रवाशांना विकत असल्याचे समोर आले.रफिक महम्मद नाईक याला आरपीएफ पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीत त्याने वैयक्तिक यूजर आयडी बनवून मोबाईलच्या माध्यमातून गरजू प्रवाशांना किरकोळ पैसे घेऊन तिकिटे देत असल्याचे कबूल केले.
तिकिटे काळजीपूर्वक घ्या...
दरम्यान रेल्वे पोलिसांनी (Nashikroad Railway Police) रफिक यांच्याकडून तिकिटांचा काळाबाजार बाबत सर्व माहिती गोळा केली. मोबाईलच्या माध्यमातून हा काळाबाजार होत असल्याचे समोर आले. यासाठी मोबाईल अॅपची मदत घेत असल्याची देखील माहिती आहे. पोलिसांनी या सर्व व्यवहारासाठी वापरत असलेला मोबाईल जप्त केला आहे. त्याचबरोबर साडेसात हजारांची ताजी तिकिटे आणि 23 हजार 419 किमतीची 16 जुनी तिकिटे आढळली, अशी सुमारे 30 हजारांची 20 तिकिटे जमा करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र कुमार तपास करीत आहेत. तसेच प्रवाशांना तिकिटांच्या काळाबाजाराबाबत काही माहिती असल्यास त्वरित रेल्वे सुरक्षा बलाशी अथवा रेल्वेच्या प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
इतर महत्वाची बातम्या