Nashik Saptshrungi Devi : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळला, सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्राच्या 81 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता
Nashik News : श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या 81.86 कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शनिवारी नाशिक (Nashik) दौरा केला, यात सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर कळवण मेळाव्यात सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी घोषणा केली. आज लागलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 81 कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला असून अवघ्या दोन दिवसांत मान्यता मिळाल्याने तीर्थक्षेत्राला झळाळी मिळणार आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवी दर्शनासाठी (Saptshrungi Devi) देशभरातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या तीर्थक्षेत्राची एक वेगळीच ओळख आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्तशृंगी देवी मंदिराला भेट दिली. यानंतर कळवण येथे शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात त्यांनी सप्तशृंगी तीर्थक्षेत्र (Saptshrungi Devi mandir) विकासासाठी 81 कोटी रुपयांची घोषणा केली. त्याचबरोबर सोमवारी याबाबत बैठक घेऊन मंजुरी देखील घेतली जाईल असेही आश्वासन दिले होते. त्यानुसार आज राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची आज बैठक झाली. या बैठकीत श्री क्षेत्र सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्राच्या 81.86 कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान याबैठकीत श्री सप्तशृंगी देवी विकास आराखड्याबाबत चर्चा झाली. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी (Nashik Collector) या तीर्थक्षेत्र विकासासाठी 81.86 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. हा सुधारित आराखडा 25 कोटींपेक्षा अधिक असल्याने तो ग्रामविकास विभागाकडून नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सुधारीत आराखड्यात स्वच्छतागृह बांधणे, डोम बसविणे, दरड कोसळण्यापासून संरक्षणात्मक जाळी बसविणे आदी विविध कामांचा समावेश आहे. त्यामुळे अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी कळवण सह नाशिककरांना दिलेला शब्द पाळला असून तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि परिसरात पर्यटनवाढीसाठी देखील प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.
राज्यातील तीर्थक्षेत्र विकास आराखडा....
श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये 92 कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले. मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाईट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे. लेझर शो करताना नागरिकांच्या डोळ्यांना इजा होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर श्री क्षेत्र घृष्णेश्वर विकास आराखड्यामध्ये वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आले आहे. लेणी क्रमांक एक ते महादेव मंदिर हा नविन रस्ता 1.650 किमीमी लांबीचा असून त्यासाठी 27.58 कोटी खर्च अपेक्षित असल्याचे यावेळी सांगितले. त्याचबरोबर बांधकामासाठी 16 कोटींची वाढीव निधी यानुसार 163 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.
इतर महत्वाची बातमी :