Nashik News: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून वसुली करू नका, अन्यथा कारवाई होणार; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कडक आदेश
Nashik News: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून वसुली न करण्याचे आदेश नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना दिले आहेत.

Nashik News: अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी राज्य शासनाने (Maharashtra Government) आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. लक्ष्मीपूजनापूर्वी मदतीची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर जमा केली जाणार आहे. ही रक्कम परस्पररीत्या कर्जखात्यावर किंवा रोखून धरणाऱ्या बँकांवर आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी दिला आहे.
यंदा सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी उभ्या पिकांचा चिखल झाला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरीराजा संकटात सापडला आहे. महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार जिल्ह्यात 4 लाख 9 हजार 474 शेतकर्यांचे एकूण 2 लाख 88 हजार 806 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
Nashik News: लक्ष्मीपूजनापूर्वी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
शासनाने जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 317 कोटी 15 लाख 77 हजार रुपयांचे अनुदान दिले असून ते प्रशासनाला प्राप्त झाले आहे. या अनुदानाची रक्कम ही लक्ष्मीपूजनापूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या बँकखात्यात जमा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.
Nashik News: कारवाई करण्याचा इशारा
परंतु, शासनाने देऊ केलेल्या मदतीची रक्कम ही बँकाकडून परस्पर कर्जखात्यावर वर्ग केली जाण्याची अथवा कर्जाचे हते थकल्याने बँकाकडून रोखून धरली जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे व्यवस्थापकांसाठी आदेश काढले आहेत. या आदेशात कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाईची रक्कम कर्जखात्यात वर्ग करण्यास बंधने पालण्यात आली आहेत तसेच रक्कम रोखूनही धरण्यास मनाई केली आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर थेट आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
NDCC Bank: जिल्हा बँकेला हवी परवानगी
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्ह्यातील 56 हजार थकबाकीदारांकडे 2200 कोटींचे कर्ज थकीत आहे. कर्जदारांसाठी बँकेने राज्य शासनाच्या परवानगीने नवीन कर्ज सामोपचार परतफेड योजना लागू केली. या योजनेत कर्जदारांकडून 2 ते 6 टक्क्यांपर्यंत व्याजाची आकारणी केली जात आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत योजनेतून 34 कोटींची वसुली केली. पण सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे शासनाने कर्जवसुलीस स्थगिती दिल्याने बँकेची अडचण झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीचा फटका बसलेली गावे सोडून उर्वरित शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीस परवानगी मिळावी, यादृष्टीने बँक प्रयत्नशील आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
आणखी वाचा
























