(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime News : 33 हजारांचा नायलॉन मांजा जप्त, दोघांना अटक; नाशिक पोलिसांची कारवाई
Nashik Crime News : नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोन संशयितांना मखमलाबाद परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गुन्हेशाखा युनिट 1 च्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Nashik Crime News नाशिक : बंदी असलेला नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्या दोन संशयितांना मखमलाबाद (Makhmalabad) परिसरात सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४३ गट्टू हस्तगत करण्यात आले आहेत. गुन्हेशाखा युनिट 1 च्या पथकाने (Nashik Police) ही कारवाई केली आहे.
मकर संक्रांत (Makar Sankranti 2024) म्हटली की, पतंग (Kite) उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पतंगासोबत लागणारा नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी आणि नागरिकांसाठी त्रासदायक ठरतो. नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Nashik City Police Commissioner Sandeep Karnik) गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी बेकायदेशीररित्या नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याबाबतचा आदेश याआधी जारी केला होता.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा, युनिट क. 1 चे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत नायलॉन मांजाबाबतची माहिती मिळाली. स्वामी विवेकानंदनगर मखमलाबाद, नाशिक येथे दोन व्यक्ती बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आणणार असल्याचे समजले. ही माहिती त्यांनी वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, अंमलदार मिलींदसिंग परदेशी, राजेश राठोड, राहुल पालखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी यांनी सापळा रचून विकास शिवसिंग देवरे (27 रा. मखमलाबाद, नाशिक),अभिषेक सोपान भंडागे (21) यांना ताब्यात घेतले.
33 हजारांचा मुद्देमाल जप्त
त्यांच्याकडून दोन प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये असलेले 43 नग बंदी असलेला मोनोकाईट कंपनीचे नायलॉन मांजाचे गट्टू, असा 33 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोघांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक पोलिसांकडून कारवाईचा इशारा
नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दि. 23 जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री व वापरावर मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास तडीपार, हद्दपार व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : ...तर भाजपला प्रभू श्रीराम देखील वाचवणार नाहीत; संजय राऊतांचा खोचक टोला