Nashik Citylink Bus Strike : सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, तीन दिवसांनंतर बस सेवा पुन्हा सुरळीत, नाशिककरांना दिलासा
Nashik Citylink Bus Strike : मागील तीन दिवसांपासून सिटीलिंक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. अखेर प्रशासनाने मागण्या मान्य केल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे.
नाशिक : सिटीलिंक बस सेवेच्या चालक कर्मचाऱ्यांनी मागील तीन दिवसांपासून काम बंद आंदोलनाचा (Citylink Bus Strike) निर्णय घेतला होता. शहर बस सेवा मागील तीन दिवसांपासून ठप्प असल्यामुळे नाशिककरांची मोठ्या प्रमाणात वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती. अखेर आज शहर बससेवेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
शहरात महापालिका प्रशासनाने (Nashik NMC) सिटीलिंक बससेवा ठेकेदारामार्फत सुरू करून यासाठी चालक व वाहक भरती करण्यात आली होती. मात्र, पूर्वीच्या एका राजकीय पक्षाच्या ठेकेदाराकडून वेतन वेळेत दिले जात नसल्याने तब्बल नऊ वेळा वाहकांनी संप पुकारल्याने बससेवा विस्कळीत झाली होती. मात्र, चालकांनी शनिवारी पंधरा हजारांच्या पगारवाढीसाठी आंदोलन पुकारत नागरिकांना वेठीस धरले होते.
वेतनवाढीसाठी पुकारला होता बंद
सिटीलिंकच्या जवळपास 600 कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने तपोवन व नाशिकरोड डेपोतून दोन दिवस एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे नाशिककरांचे हाल होताना दिसले. मनसे (MNS) कामगार सेनेने मनपाच्या सिटीलिंक बससेवा चालकांच्या वेतनवाढीसाठी पुकारलेला बंद रविवारीही कायम होता. मनसे कामगार संघटना व चालक मक्तेदार यांच्यात रविवारी उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. आज त्यांच्यात पुन्हा एकदा बैठक झाली.
शहर बस सेवा तीन दिवसांनंतर सुरळीत
पाच हजार रुपये पगारवाढ आणि प्रति एक किलोमीटर इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार आघाडीच्या संपात जवळपास 600 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील बस सेवा ही तीन दिवसांपासून ठप्प झाली होती. अखेर आज प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. तर एलपीएलनुसार वार्षिक 15 ते 20 सुट्ट्या देण्याचाही निर्णय शहर बससेवेचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शहर बस सेवा टप्प्याटप्याने सुरळीत होत आहे. यामुळे नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
वारंवार आंदोलनामुळे सिटीलिंक प्रशासनाची कोंडी
दरम्यान, वारंवार संप पुकारून नाशिककरांना वेठीस धरणाऱ्या वाहक व चालकांमुळे सिटीलिंक प्रशासनाची कोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. नाशिककरांचे सतत होणारे हाल पाहून प्रशासनाच्या संयमाचा कडेलोट झाल्याचे दिसले. त्यामुळेच थेट चालकांविरोधात मेस्साअंतर्गत कारवाईचा बडगा सिटीलिंक प्रशासनाने उगारला होता.
आणखी वाचा