Nashik Citylink Bus Strike : नाशकात पुन्हा सिटीलिंकचा संप, प्रशासनाकडून चालकांविरोधात कारवाईचा बडगा, नाशिककरांचे मेगा हाल
Nashik Citylink Bus Strike : पंधरा हजारांच्या पगारवाढीसाठी चालकांनी संप पुकारल्याने नाशिककरांचे मेगा हाल होत आहे. यामुळे चालकांविरोधात आता सिटीलिंक प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
नाशिक : तीन वर्षांत आजवर तब्बल नऊ वेळा सिटीलिंकच्या (Citylink) वाहकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारत नाशिककरांना वेठीस धरण्याचे काम केले होते. दरम्यान शनिवारी चालकांनी पंधरा हजारांच्या पगारवाढीसाठी संप पुकारल्याने नाशिककरांचे मेगा हाल झाले. चालकांनी संप मागे घ्यावा, असे वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल 10 हून अधिक चालकांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासनाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर चालक आज संप मागे घेणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मनसे कामगार सेनेतर्फे संप
शहराची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनपाच्या सिटीलिंक बससेवाचालकांनी वेतन वाढीसाठी शनिवारी (दि. 27) सकाळपासून एल्गार पुकारल्याने बससेवा विस्कळीत झाली होती. मनसे कामगार सेनेतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. तपोवन व नाशिकरोड सिटीलिंक बस डेपोतून सकाळी 6 वाजेपासून एकही बस बाहेर दैनंदिन मार्गावर न धावल्याने शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. बस बंद असल्याने सर्वच बस डेपोमध्ये उभ्या होत्या. दिवसभर डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही. चालकांना वेतनवाढ मिळावी यासाठी मनसे कामगार सेनेतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे.
सिटीलिंक प्रशासन आक्रमक
दरम्यान, मनपाने काही वर्षांपूर्वी सिटीलिंक बससेवा सुरू करून ठेकेदारामार्फत चालक व वाहक भरती केली होती. यापूर्वी वाहकांचा ठेका घेणाऱ्या मक्तेदाराकडून वेळेत वेतन नसल्याचे कारण देत वाहकांनी नऊ वेळा संप पुकारल्याचे चित्र होते. त्यानंतर आता यामध्ये चालकांनी देखील शनिवारी संप पुकारल्याचे दिसले, मात्र त्यांचे जास्त लाड न करता सिटीलिंक प्रशासनाने आक्रमक होत थेट त्यांच्या विरोधात मेस्साअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.
सिटीलिंक प्रशासनाची कोंडी
वारंवार संप पुकारून नाशिककरांना वेठीस धरणाऱ्या वाहक व चालकांमुळे सिटीलिंक प्रशासनाची कोंडी होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. नाशिककरांचे सतत होणारे हाल पाहून प्रशासनाच्या संयमाचा कडेलोट झाल्याचे दिसले. त्यामुळेच थेट चालकांविरोधात मेस्साअंतर्गत कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसत आहे. आता चालक संप मागे घेणार की नाही? याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime : वर्गणी न दिल्याने एकावर गोळीबार, तीन महिन्यांपासून गुंगारा देणाऱ्या सराईताला बेड्या