Nashik News : नाशकात थंडीची चाहूल, चांदीच्या गणपतीला घातलं स्वेटर अन् शॉल; बाप्पाला पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
Nashik News : जिल्ह्यात कुठे बोचरी थंडी तर कुठे आल्हाददायक थंडीचा अनुभव नाशिककर घेत आहेत. रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपतीला स्वेटर आणि शॉल पांघरण्यात आली आहे.
Nashik News : नाशिकमधील (Nashik) तापमानाचा पार दिवसेंदिवस घसरत चालला आहे. कडाक्याच्या थंडीचे (Cold) नाशिकमध्ये आगमन होत आहे. जिल्ह्यात कुठे बोचरी थंडी वाजत आहे तर कुठे आल्हाददायक थंडीचा अनुभव नागरिक घेत आहेत. काही जण थंडीचा आनंद घेताना दिसून येत आहेत तर काहींनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे परिधान केल्याचे चित्र आहे.
थंडीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रविवार कारंजा येथील चांदीच्या गणपती मंदिरात (Chandicha Ganpati Ravivar Karanja Nashik) गणेश मूर्तीला स्वेटर आणि शॉल पांघरण्यात आली आहे. चांदीच्या गणपती मंदिरात गेल्या 10 वर्षांपासून मूर्तीला स्वेटर आणि शॉल घालण्याची परंपरा आहे. जशी आपल्याला थंडी वाजते तशी गणपती बाप्पालाही (Ganpati Bappa) थंडी वाजत असेल म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे.
बाप्पाला ऊब मिळाली तर आपल्यालाही मिळेल
थंडीची सुरुवात होते तशी नागरिकांना थंडी जाणवू लागते. त्याच स्वरुपात जो भाव आपल्यात आहे, जी उर्जा आपल्यात आहे ते चैतन्य तसेच राहावे. बाप्पाचे थंडीपासून रक्षण व्हावे म्हणून मूर्तीला स्वेटर आणि शॉल घालण्यात आली आहे. बाप्पाला जर का ऊब मिळाली तर आपल्यापर्यंत देखील ऊब पोहोचेल. संध्याकाळी साडेसातच्या आरतीनंतर आम्ही बाप्पाला केसरी रंगाचे स्वेटर परिधान करतो. त्यानंतर साधारणपणे पावणे नऊ वाजता स्वेटर आणि शॉल घातले जातात, मंदिराच्या पुजारींनी म्हटले आहे.
भक्तांमध्येही ठरते आकर्षण
बाप्पाला स्वेटर आणि शॉल परिधान केल्याने मंदिरात येणाऱ्या भक्तांना त्याचे मोठे आकर्षण वाटत आहे. बाप्पाचे सुंदर रूप पाहण्यासाठी भाविक मंदिर परिसरात मोठी गर्दी करत आहेत. 1 जानेवारीपासून आम्ही हे वस्त्र घालण्याला यंदा सुरुवात केली आहे. जशी जशी थंडी कमी होईल तशी तशी आम्ही बाप्पाला स्वेटर परिधान करणे बंद करू असेही पुजारींनी सांगितले.
तीन दिवस पावसाची शक्यता
नाशिक, जळगाव, अहमदनगरसह अन्य जिल्ह्यांमध्ये तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच धुळे, नंदुरबार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmers) चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- ABP Majha Exclusive : अयोध्या विमानतळावर नाशिकच्या कलावंतांचा कलाविष्कार; 305 फुटांच्या कॅनव्हास पेंटिंगची देशभरात चर्चा
- Nashik Political News : नाशकात भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा?; शहराध्यक्षांचे भावी आमदार म्हणून झळकले होर्डिंग्ज