ABP Majha Exclusive : अयोध्या विमानतळावर नाशिकच्या कलावंतांचा कलाविष्कार; 305 फुटांच्या कॅनव्हास पेंटिंगची देशभरात चर्चा
Exclusive Nashik News : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्याकडे देशभराचे लक्ष लागले आहे. अयोध्या विमानतळावर 305 फूट भव्य कॅनव्हास पेंटिंग साकारली आहे.
Exclusive Nashik News : अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्याकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागले आहे. अयोध्यानगरी राममय झाली असून नुकतेच उद्घाटन झालेले महर्षी वाल्मिकी विमानतळही अनोख्या वास्तुकलेमुळे देशभरात चर्चेत आहे. विमानतळामध्ये भिंतीवरील दर्शनी भागात साकारण्यात आलेली 305 फूट भव्य आणि सुंदर अशी रामाच्या जीवनचरित्रावर आधारित कॅनव्हास पेंटिंग सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
विशेष म्हणजे ही कलाकृती साकारणारे हात हे मराठी आहेत. नाशिकच्या आनंद सोनवणे (Anand Sonawane), विवेक सोनवणे (Vivek Sonawane), प्रवीण वाघमारे (Pravin Waghmare) आणि सचिन कालूस्कर (Sachin Kaluskar) या चारही मराठी कलाकारांनी जवळपास आठ महिने मेहनत घेत कलामकारी आणि पट्टाचित्र शैलीतून हा कलाविष्कार तयार केला आहे.
रामायणातील जीवनपट उलगडणार
रामाच्या जन्मापासून ते रावण दहन करून राम अयोध्येत परतल्यानंतरच्या क्षणापर्यंतचे सर्व काही प्रसंग दाखवण्याचा त्यांनी १४ विभागातून हुबेहूब प्रयत्न केला आहे. तसेच दुसऱ्या भिंतींवर हनुमानाच्या जीवनचरित्रावर आधारित कॅनव्हास पेंटिंग देखील त्यांनी साकारली आहे.
अयोध्येत सेवा करण्याची संधी मिळणं हे आमचे भाग्य
हे सर्व काही सोपं नव्हतं, प्रत्येक पेंटिंगच्या छोट्या छोट्या गोष्टींवर अगदी पंतप्रधान कार्यालयापासून ते अयोध्या मंदिर संस्थानचे लक्ष होते असे हे कलाकार सांगतात. श्रीरामांच्या अयोध्येत सेवा करण्याची संधी मिळणं हे आमचे भाग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा स्वतः आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर या पेंटिंगचे फोटो टाकले तेव्हा खूप समाधान वाटले, आनंद झाला अशी भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केली आहे.
काम करण्यासाठी उर्जा मिळाली
यावेळी आनंद सोनवणे म्हणाले की, अनुभव हा अतिशय सुंदर होता. अयोध्येच नाव आज जगभरात पोहोचले आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला सर्वांनीच शाब्बासकी दिली. यामुळे काम करण्यासाठी उर्जा मिळाली. मात्र आपण हे काम पूर्ण करू शकू की नाही याबाबत भीती देखील वाटली होती. आम्ही हे काम अखेर पूर्ण केले.
अशी झाली निवड
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून साधारण 7 ते 8 गटांना कामाचे विभाजन करण्यात आले होते. त्यांनी आम्हाला विचारले की, तुम्ही कोणत्या प्रकारचे डिझाईन देऊ शकतात. त्यानंतर आम्ही त्यांना आमच्याकडील डिझाईन सादर केली. डिझाईनची प्रक्रिया सुमारे सात ते आठ महिने चालली. पंतप्रधान कार्यालय, राम मंदिर ट्रस्ट, अयोध्येतील महंत यांच्याकडून सहमती आल्यानंतर आम्हाला मंत्रालयातून फोन आला की तुमचे डिझाईन निवडण्यात आले आहेत. त्यानंतर डिझाईनमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले. अत्यंत बारकाईने हे काम केले गेले.
अन् साकारली 305 फूट भव्यदिव्य कॅन्व्हास पेंटिंग
विवेक सोनवणे म्हणाले की, आपण अयोध्या विमानतळावर गेल्यावर लगेचच समोर 305 फूट भव्यदिव्य अशी श्री रामाच्या जीवनचरित्रावर आधारित कॅनव्हास पेंटिंग दिसेल. या मध्ये आम्ही 14 विभाग केले आहेत. रामाच्या जन्मापासून ते रावण दहन करून राम अयोध्येत परतल्यानंतरच्या क्षणापर्यंतचे पेंटिंग येथे रेखाटण्यात आले आहे. अयोध्या हे एक धार्मिक शहर म्हणून आता विकसित होत आहे. त्यामुळे भारतीय पौराणिक कथांचा अभ्यास करून आम्ही हे पेंटिंग साकारले आहे.
आणखी वाचा
Uddhav Thackeray : 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार : उद्धव ठाकरे