Nashik Political News : नाशकात भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा?; शहराध्यक्षांचे भावी आमदार म्हणून झळकले होर्डिंग्ज
Nashik News : लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अजून झालेले नाही. मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये आतापासूनच विधानसभेसाठी मतदारसंघावर रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
Nashik Political News नाशिक : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Loksabha & Vidhansbha Elections) नेमक्या कधी होतील? हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. मात्र आतापासूनच निवडणुकीचे पडघम वाजायला राजकारण्यांमध्ये सुरुवात झाल्याचे चित्र आहे. अजून लोकसभा निवडणुकीचे जागावाटपदेखील झालेले नाही मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये आतापासूनच मतदारसंघावर रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या नाशिक (Nashik News) शहरातील बहुतांश भागात भावी खासदार आणि भावी आमदारांचे होर्डिंग्ज झळकत आहेत. असाच एक भावी आमदाराचा फलक नाशिकमध्ये शुक्रवारी झळकला आहे. अजित पवार गटाचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांच्या होर्डिंग भावी आमदार या मजकुरासह लावण्यात आला आहे.
देवयानी फरांदेंच्या मतदारसंघात भावी आमदार म्हणून झळकले होर्डिंग्ज
सलग दोन वेळा नाशिक मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांचे भावी आमदार या मजकुरासह होर्डिंग्ज लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोण आहेत रंजन ठाकरे?
रंजन ठाकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नाशिक शहराध्यक्ष आहेत. दि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकच्या व्हाईस चेअरमनपदी त्यांची नुकतीच निवड झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रंजन ठाकरे राष्ट्रवादी पक्षात कार्यरत आहेत. अजित पवार समर्थक म्हणून ते ओळखले जातात. त्यांची आई माजी नगरसेविका आहे.
अजित पवार गटाच्या होर्डिंगवर शरद पवारांचा फोटो
नाशिक शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे वाटाघाटीत तिन्ही मतदारसंघ पुन्हा भाजपाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या होर्डिंग्जमुळे महायुतीतील चढाओढ अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर असलेला शरद पवारांचा फोटोदेखील लक्ष वेधून घेत आहे.
नेत्यांमध्ये होर्डिंग्ज वॉर
रंजन ठाकरे यांच्या होर्डिंग्ज समोरच देवयानी फरांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे होर्डिंग्ज लावण्यात आल्याने महायुतीच्या दोन्ही प्रमुख पक्षात होर्डिंग्ज वॉर बघायला मिळत आहे. तसेच भाजपच्या मतदारसंघावर आता राष्ट्रवादी दावा ठोकतंय का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
स्थानिक पातळीवर अनेक उमेदवार करतायेत निवडणुकीची तयारी
दोन दिवसांपूर्वी भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांबाबतच्या आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आम्ही आगामी निवडणुका एकत्र लढू, असे विधान केले होतो. राज्य पातळीवर वरिष्ठ नेते जरी निवडणुका एकत्र लढण्याचे संकेत दिले असले तरी मात्र स्थानिक पातळीवर अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आपल्या नेत्याचे होर्डिंग्ज लावून आपल्या नेत्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Amol Kolhe : तो गट म्हणजे अजित पवार मित्र मंडळ; अमोल कोल्हेंचा जोरदार हल्लाबोल