Nashik News : नाशिक बाजार समितीच्या उत्पन्नात 40 लाखांची घट; माजी सभापतींचा गंभीर आरोप, थेट पणनमंत्र्यांना धाडलं पत्र, भाजप विरुद्ध राष्ट्रवादीत पुन्हा संघर्ष
Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik Bajar Samiti) पुन्हा एकदा भाजप (BJP) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Ajit Pawar Faction) संघर्ष पाहायला मिळत आहे. मार्च महिन्यात देविदास पिंगळे (Devidas Pingale) यांच्यावर अविश्वास ठराव आणत त्यांची सत्ता उलथवून भाजपच्या कल्पना चुंभळे सभापती झाल्या होत्या. यानंतर आता बाजार समिरीत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप बाजार समितीचे माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांनी केला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात सुमारे ४० लाख रुपयांची मोठी घट झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. देवीदास पिंगळे यांनी या घटनेमागे प्रशासनातील गंभीर अनियमितता व भ्रष्टाचार असल्याचा ठपका ठेवत संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.
वर्ष 2024-25 च्या एप्रिल महिन्यात बाजार समितीचे उत्पन्न सुमारे 2 कोटी 23 लाख रुपये इतके होते. मात्र, 2025-26 च्या एप्रिलमध्ये हे उत्पन्न घटून फक्त 1 कोटी 90 लाख रुपयांपर्यंत आले आहे. देवीदास पिंगळे यांनी 23 मे रोजी जिल्हा उपनिबंधक व राज्याचे पणन व शिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांना लेखी निवेदन पाठवून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंत्री रावल यांनी तीन आठवड्यांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. बाजार समितीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आर्थिक अनियमितता सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, हे प्रकरण आता राजकीय रंगही घेत आहे.
बाजार समितीचे भवितव्य अंधारमय : देविदास पिंगळे
बाजार समितीतील सभापती व संचालक यांनी काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाजार समितीत जमा होणारे उत्पन्न हे रोख स्वरुपात वसूल केले आहे. संबंधितांना कोणतीही पावती न देता वसूल रक्कम सभापती व संचालक परस्पर वाटून घेत आहेत. तसेच बाजार समितीत असलेले आरक्षित भूखंड ज्याचा वापर शेतकरी व व्यापारी यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी केला जातो. सदर भूखंड हे बाजार समिती सभापती व संचालक कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या जवळच्या व पैसे देणाऱ्या बाहेरच्या लोकांना ११ वर्षांच्या करारावर देत आहेत. असे झाले तर शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. पुढील काळात बाजार समितीचे भवितव्य अंधारमय आहे, अशी प्रतिक्रिया देवीदास पिंगळे यांनी दिली आहे.
आणखी वाचा























