Anna Hazare on Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारेही मैदानात; म्हणाले, कुंभमेळा समाजहिताचा असला तरी...
Anna Hazare on Nashik Tree Cutting: तपोवन परिसरातील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील कडाडून विरोध केला आहे.

Anna Hazare on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून, साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्याची योजना आहे. या कामासाठी 1800 झाडांची तोड (Nashik Tree Cutting) प्रस्तावित असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजीचा उद्रेक झाला आहे. तसेच अभिनेते सयाजी शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील तपोवन वृक्षतोडीबाबत विरोध केलाय. आता तपोवन परिसरातील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी देखील कडाडून विरोध केला आहे.
Anna Hazare on Nashik Tree Cutting: नेमकं काय म्हणाले अण्णा हजारे?
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत. मात्र, मोठ्या झाडांना तोडू नये, अशी माझी विनंती असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
Nashik Tree Cutting: नवीन एसटीपी प्लांटसाठी तीनशे झाडांची कत्तल; पर्यावरणप्रेमींचा आरोप
आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात उभारल्या जाणाऱ्या नवीन एसटीपी (STP) प्लांट प्रकल्पावर मोठं वादळ उठलं आहे. तपोवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. पर्यावरणप्रेमींनी केलेल्या आरोपानुसार, 300 पेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आली असून, यामुळे परिसरातील जैवविविधता आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, साधुग्राम परिसरातील 1800 झाडांचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नसताना, नवीन एसटीपी प्लांटसाठी झाडांची तोड करण्यात आली, असा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 447 झाडे तोडण्याची अधिकृत नोटीस देण्यात आली होती. त्यातील 300 झाडे तोडण्यात आली असून उर्वरित झाडे वाचवण्यात आली, असा दावा प्रशासनाने केला आहे. आगामी कुंभमेळा लक्षात घेऊन शहरातील विकासकामांना वेग आला असला तरी, त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ नये, अशी स्थानिकांची भावना आहे. आता पर्यावरण प्रेमींनी केलेल्या आरोपानंतर तपोवन परिसरात उभारल्या जाणारे नवीन एसटीपी प्लांट वादात सापडले आहे.
आणखी वाचा























