Nashik : नांदगावातील आपले सरकार, सेतू कार्यालय तसेच ई-सेवा केंद्र रडारवर, तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश
Nandgaon Aaple Sarkar : आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालये व ई-सेवा केंद्रांच्या तपासणीसाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहे. दोषी आढळणाऱ्यावर जागेवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिक : नांदगाव तालुक्यातील (Nandgaon Nashik) आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालय तसेच ई-सेवा केंद्रांविरोधात वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रांची तात्काळ तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीमध्ये दोषी आढळणाऱ्या केंद्रधारकांवर निलंबनाची नोटीस बजावण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील संबंधित केंद्रधारकांवर निलंबनाची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
नांदगाव तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालये व ई-सेवा केंद्रांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तशी माहिती तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी दिली. या केंद्रांसंबंधी वाढत्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर या संदर्भात तहसीलदारांची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत कारवाईचे आदेश काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Nandgaon Aaple Sarkar Centre : तपासणीसाठी पथके तयार
या केंद्रांच्या स्वतंत्र तपासणी पथके नेमण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये नायब तहसीलदार, अव्वल कारकून, तलाठी आणि मंडल अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ही पथके प्रत्येक केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत.
तपासणी दरम्यान दुसऱ्याची आयडी वापरणे, मंजूर केलेल्या जागेऐवजी अन्य ठिकाणी केंद्र चालविणे, तक्रार पुस्तिका उपलब्ध असणे, नेट कनेक्टिव्हिटी, नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था आदी एकूण 19 मुद्द्यांवर तपासणी करण्यात येणार आहे. या 19 नियमांचे पालन न करणाऱ्या केंद्रधारकांना तात्काळ जागेवरच निलंबनाची नोटीस बजावण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Nashik SETU Office : जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेक समस्या
दरम्यान, काही केंद्रांकडून वाजवीपेक्षा अधिक शुल्क वसूल केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच आवश्यक शासकीय दाखले अधिकृत कार्यालयातून पाच ते सात दिवसांत मिळत असताना, खासगी केंद्रांतून तेच दाखले अवघ्या एका दिवसात मिळत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या.
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता तालुक्यातील संबंधित सेवा केंद्रधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगामी काळात तपासणी दरम्यान कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:























